बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) आता हिजाबवरून (Hijab) वाद पेटला आहे. या वादामुळे राज्य सरकारवर शाळा (Schools) आणि महाविद्यालये (Colleges) काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. राज्यात घडत असलेल्या या घडामोडींमुळे धार्मिक सलोख्याला धोका निर्माण होण्याची वेळ आली आहे. या सगळ्या वादावर रामकृष्ण आश्रमाच्या (Ramkrishna Ashram) स्वामी भावेशानंद यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी हिंदुत्ववाद्यांना फटकारत हा वाद अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.
स्वामी भावेशानंद म्हणाले की, मुस्लिम मुलींच्या शाळा आणि महाविद्यालयातील ड्रेसकोडबद्दल अनावश्यक चर्चा सुरू आहे. याबाबत समाजात वेगवेगळ्या स्तरांवर वाद निर्माण झालेला दिसत आहे. या वादामुळे मी व्यथित झालो आहे. हा वाद चांगल्या हेतूने सुरू झालेला दिसत नाही. तो समाजाची शांतता आणि सलोख्याच्या हिताचाही नाही.
हिजाबबाबत मुस्लिम मुलींच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी बाजू मांडली होती. त्यावेळी त्यांनी कुराणमधील काही भाग वाचून दाखवला होता. यावरून हिंदुत्ववाद्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. त्यांना हिंदूविरोधी ठरवण्यात येत आहे. याचाही समाचार स्वामी भावेशानंद यांनी घेतला. ते म्हणाले की, काही घटकांनी कामत यांनी हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा प्रकार चुकीचा आहे. आपल्या अशिलाची बाजू न्यायालयात मांडणे हे वकिलाचे कर्तव्य असते. ही त्याचे व्यावसायिक कर्तव्य आणि जबाबदारीही असते. स्वत:चे कर्तव्य पार पाडत असलेल्या वकिलाला हिंदूविरोधी ठरवणे अयोग्य आहे.
अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.
शाळा, महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू
बुरखा बंदीच्या निर्णयावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. बोम्मई यांनी आजपासून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी बंदी घालणाऱ्या शाळा व महाविद्यालयांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.