
New Delhi : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा मंगळवारी सेवेतील अखेरचा दिवस आहे. जवळपास सहा वर्षे त्यांनी आरबीआयची धुरा सांभाळत अनेक आव्हानांचा सामना करत बँकेला अधिक मजबूत स्थितीत नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज कामकाजाच्या शेवटच्या दिवशी दास यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शक्तिकांत दास यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचेही आभार मानले आहेत. त्यांनी पाच पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज RBI चे गव्हर्नर हे पद सोडणार आहे. तुम्हा सगळ्यांचे समर्थन आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो.
दुसऱ्या पोस्टमध्ये दास यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप-खूप आभार. त्यांनी मला आरबीआयच्या गव्हर्नर या पदावर देशाची सेवा करण्याची संधी दिली. त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनासाठी आभार मानतो. त्यांचे विचार आणि सुचनांचा खूप फायदा झाला.
दास यांनी अर्थमंत्र्यांविषयीही भावना व्यक्त केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सातत्यपूर्ण समर्थनासाठी हार्दिक आभार. मागील सहा वर्षांत राजकोषीय-मुद्रा समन्वय सर्वोच्च स्तरावर होता. या काळात अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली, असे दास यांनी म्हटले आहे.
आरबीआयच्या संपूर्ण टीमचेही दास यांनी आभार मानले आहेत. आपण सर्वांनी एकत्रितपणे अभूतपूर्व जागतिक स्तरावरील कठीण काळ यशस्वीपणे पार केला. रिझर्व्ह बँक विश्वास आणि विश्वसनीयता असलेल्या संस्थेच्या रुपात उच्च स्तरावर पोहचावी, यासाठी प्रयत्न केले. सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे दास यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
शक्तिकांत दास यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी गव्हर्नर पदाचा कार्यभार हाती घेतला होता. तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर दास यांच्याकडे हे पद आले. त्यांना एक वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली होती. मागील वर्षीच ते निवृत्त होणार होते. मंगळवारी त्यांच्या सेवेचा अखेरचा दिवस आहे.
प्रामुख्याने कोरोना काळात जगभरातील अनेक देशांसमोर आर्थिक संकट उभे ठाकलेले असताना भारतात दास यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्हे बँकेने उल्लेखनीय काम करत अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले. आता संजय मल्होत्रा हे नवे गव्हर्नर असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.