Uttar Pradesh Politics : लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने कमाल करत भाजपला धूळ चारली. अयोध्येतील राम मंदिर ज्या लोकसभा मतदारसंघात आहे, तो फैजाबाद मतदारसंघही सपाने मिळवला. आता सपाकडून त्याचेच भांडवल करत भाजपवर निशाणा साधला जात आहे. पण याच अयोध्येने आता पक्षाला झटका दिला आहे.
अयोध्येमध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणात सपाचे नेते मोईद खान यांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सपा आणि सत्ताधारी भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नाकीनऊ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद आणि मोईन खान यांच्यातील राजकीय संबंधांवरून भाजपने पक्षाला घेरलं आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अवधेश प्रसाद यांनी मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे सपाची डोकेदुखी वाढली आहे.
अयोध्येतील विजयानंतर विरोधकांकडून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण खासदार अवेधश प्रसाद यांच्याविषयीच वाद निर्माण झाल्याने विरोधक बॅकफूटवर गेले आहेत. अवधेश यांचे पुत्र अजित यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बलात्कार प्रकरणामुळे त्यांच्या उमेदवारीवरही आता प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. दोन महिन्यांपासून विजयाचा जल्लोष साजरा करणारे अखिलेश यादव आपल्या नेत्यांमुळे टीकेचे धनी होत आहेत. योगी सरकारने मोईद खान यांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर चालवत विरोधकांना जबर झटका दिला आहे. त्यामुळे ज्या अयोध्येने विरोधकांना अच्छे दिन दाखवले, त्याच अयोध्येने पुन्हा बॅकफूटवर आणल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.