

SCBA election result update : सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची (SCBA) नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीतील मतमोजणीवरून वाद समोर आला आहे. कार्यकारी सदस्य पदाची निवडणूक लढलेल्या सहा उमेदवारांनी मतपत्रिकांची फेरमोजणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. मतमोजणीदरम्यान अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा दावा या उमेदवारांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार स्मृती कुमारी, श्वेता सिन्हा, शेहला चौधरी, सुंदरी, सचिन पहवा आणि कृष्ण कुमार गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे. SCBA च्या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, सह-सचिव आणि खजिनदार या पदांची मतमोजणी त्याचदिवशी पार पडली.
कार्यकारी सदस्य पदांसाठीची मतमोजणी १९ ऑगस्टच्या संध्याकाळी सुरू होऊन २० ऑगस्टपर्यंत चालली होती. निवडणुकीचा निकाल २१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. मतमोजणीदरम्यान विविध अनुचित मार्गांचा अवलंब करण्याचा आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. काही उमेदवारांनी नियुक्त केलेल्या अधिकृत एजंटनेच हा गैरप्रकार केल्याचे याचिकेत म्हटले आहे.
उमेदवारांचे हे एजंट प्रत्येक फेरीच्या शेवटी चुकीची घोषणा करून काही उमेदवारांच्या मतांची संख्या वाढवून सांगत होते. तर याचिका केलेल्या उमेदवारांच्या मतांची संख्या कमी केली जात होती. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये लक्षणीय तफावत पडल्याचा दावाही करण्यात आला आङे. कथित फेरफारामुळे अपात्र उमेदवारांना अधिक मते मिळाली. मतमोजणीदरम्यानच ही बाब निवडणूक समितीच्या निदर्शनास अनेक उमेदवारांनी आणून दिल्याचे याचिके म्हटले आहे.
निवडणूक समितीने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. मतमोजणीच्या पद्धतीत बदल, कोऱ्या मतपत्रिका आढळणे, पारदर्शकतेचा अभाव, घाईत झालेली मतमोजणी आदी मुद्दे याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. कार्यकारी सदस्यपदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या शेवटच्या उमेदवाराला ४३६ मते मिळाली होती. मतमोजणीत गैरप्रकार झाला नसता तर याचिकाकर्ते उमेदवार निवडून आले असते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा निकाल रद्द करून अवैध घोषित करत फेरमतमोजणी करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.