
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान ‘नमो’ थेट चीनला गेले. त्यामुळे अमेरिकेच्या ट्रम्प तात्यांच्या भुवया अन् केसांचा कोंबडाही उंचावला. येथे चीनचे प्रमुख शी जिनपिंग अन् रशियाचे अध्यक्ष पुतीनही असल्यानं सर्व जगाचं लक्ष अर्थातच या नेत्यांच्या भेटीकडे लागलं होतं. या तिन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. हास्य-विनोद केले. (कुठल्या भाषेत कुणास ठाऊक) आम्ही या संवादाचा छडा लावला. तो खालीलप्रमाणे होता...
नमो : अरे जिनपिंग भाई, आजे केटलो मोटो योग मळ्यो छे! पुतिन मामा पण साथे छे. आजे जाने आपणे त्रिदेव एक साथे आव्या छीए. बहुतज दुर्लभ प्रसंग छे.
(पुतीन-जिनपिंग दोघांनाही नमो मिठी मारायचा प्रयत्नांत असताना हे दोघेही अंतर ठेवून हस्तांदोलन करतात)
जिनपिंग (डोळे शक्य तेवढे विस्फारत) : तुम्ही कुठल्या भाषेत बोलत आहात. तुम्ही हिंदी बोलत नाही आहात असं माझा ट्रान्सलेटर सांगतोय.
पुतीन : मला वाटलं तुम्ही चायनीजमध्येच बोलत आहात. वाटलं तुमच्या चष्म्यात ‘हिंदी टू चायनीज’ ‘टेलिप्रॉम्प्टर’ लावलंय की काय?
नमो (सावरून) : मी गुजरातीत बोलतोय. अमेरिकेत वगैरे गेलं ना की इतके गुजराती भेटतात की मी गुजरातीतच बोलतो. सवय झालीय ना. अन् तसेही मागे तुम्ही भारतात आला तेव्हा तुम्हाला आमच्या गुजरातच्या अहमदाबादमध्येच घेऊन गेलो होतो. तिथं नाही का आपण साबरमती नदीच्या काठी झोपाळ्यावर झोके घेत गप्पा मारल्या होत्या. आठवतंय ना.
जिनपिंग (डोळे आणखीन बारीक करत) : आठवतंय. त्यावेळी तुम्ही ते कुठले कुठले गुजराती पदार्थ खाऊ घातले होते. तेव्हा चीनमध्ये परतल्यानंतर मला चायनीज गोड लागत नव्हतं त्यामुळे. त्यांची नावेही मला उच्चारता येत नव्हती. सवय नसल्यानं सकाळी जरा त्रास झाला, तो भाग वेगळा.
नमो : अरे वा. लक्षात आहे अजून तुमच्या. मी आताही सोबत खाकरे-ढोकळे-उंधियो-फाफड्यांची पार्सल आणली आहेत. ती नक्की खा. सध्या त्या ट्रम्प तात्यांनी एवढं तोंडचं पाणी पळवलंय ना की मी बर्गर, हॉट डॉगचं नावही घेत नाही. हेच गुजराती पदार्थ खातो. मला पूर्वी चायनीज आवडायचं नाही. पण आता शाकाहारी चायनीज खाण्याची सवय मी लावून घेणार आहे.
पुतीन : मी बाहेरचं खातच नाही. परवा अमेरिकेत ट्रम्पतात्यांना भेटलो तेव्हा सगळं मॉस्कोहूनच आणलं होतं. विमानातंच सगळी प्रातःकर्मे, अन्हिकं, नाश्तापाणी उरकून मगच अमेरिकेच्या भूमीवर उतरलो.
जिनपिंग : नमो धन्यवाद. मी तुमचे हे गुजराती पदार्थ चीनमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती मजाच आली नाही हो.
नमो (मिश्कीलपणे) : कशी येणार ‘चायना मेड’ असतील ना.
(पुतीन डोळे मिचकावून हसतात)
नमो (सावरत) : म्हणजे एवढंच की आमच्या पदार्थांची फोडणी, मसाले, पदार्थ, पाणी याची चव चीनमध्ये केलेल्या पदार्थांना येऊ शकणार नाही.
जिनपिंग : आता तुम्ही आमच्या नुडल्स खा. चायनीज खाण्याची गंमत कळेल. तुमच्याकडे इंडियन चायनीजमुळे तुम्ही धसका घेतला असेल. आमचे चायनीज पदार्थ बांबू काड्यांनी खाणं ज्याला जमलं त्याला स्वर्गीय आनंद मिळतो.
पुतीनमामा : ‘नमों’ना फार कसरत करायला लावू नका. आधीच त्यांची फार कसरत होतीये. एका बाजूने ट्रम्पतात्यांना सांभाळायचं अन् दुसऱ्या बाजूला आमचं तेलही स्वस्तात विकत घेऊन युरोपला विकायचं. भारी काम करतात ते. रशियन तेलानं त्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय.
जिनपिंग : अहो विसरा हो तुम्ही. तेल लावलेले पहिलवान आहेत ते. असा सहज कुणाच्या हातात नाही सापडायचे. आम्ही गलवान, डोकलाममध्ये खिंडीत पकडायचा प्रयत्न केला तेव्हा या कोंडीतून ते सहजपणे बाहेर आलेत. ते तात्यांचं अजिबात ऐकणार नाहीत.
नमो : आत्ताच जपानला जाऊन आलो. तिथल्या परंपरेनुसार अभिवादनासाठी झुकावं लागलं मला. नाय तर झुकत नसतो मी.
पुतीन : त्या तात्यांनी अगदी लाल पायघड्या घालून माझं स्वागत केलं. पण मी ऐकलं नाही त्यांचं. मी २५ वर्षांपासून रशियाच्या प्रमुखपदी आहे. अहो फक्त चार वर्षांसाठी आले तरी त्यांना वाटतंय की मी कायमचाच अध्यक्ष राहणार आहे. असे खूप पाहिलेत मी २५ वर्षांत. यांचं ऐकून मी युक्रेनला असाच सोडून देणार नाहीये.
जिनपिंग : आम्ही तर त्यांनी जेवढं टेरिफ लावलं त्याच प्रमाणात आम्ही त्यांच्यावर टेरिफ लावलं. त्या धाकानं तात्यांनी आम्हाला टेरिफ लावायचं स्थगित केलंय. तेव्हा ट्रम्प तात्यांच्या मनमानीपणाविरुद्ध आपण एकत्र यायलाच पाहिजे. आपण सारे भाऊ, लगेच एकत्र येऊ.
नमो (सावध होत) : हे आधी ऐकल्यासारखं वाटतंय. हां आठवलं. ‘हिंदी-चिनी भाई भाई’सारखं. अहो तुम्ही असं म्हंटलं की आमच्या अंगावर काटाच येतो बघा.
जिनपिंग : काही घाबरू नका. तात्यांवर दबाव तर वाढवू. नंतर भाऊ रहायचं की नाही ठरवू.
नमो : तुमचं आश्वासनही चायनीज प्रॉडक्टप्रमाणे असतं. नो गॅरंटी.
पुतीन : आमच्यावर विश्वास आहे की नाही तुमचा. भारत-रशिया मैत्री किती तरी जुनी आहे.
नमो : हे मात्र खरंय. म्हणून तर आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. म्हणून तर तात्या चिडलेत.
जिनपिंग : आपण नुसतं एकत्र येऊन हे तात्या ऐकायचे नाहीत. चिडून अजून काही तरी गडबड करतील.
नमो : माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण त्या ‘नोबेल’वाल्यांना मॅनेज करून एक ‘नोबेल’ तात्यांना देऊनच टाकू. शांततेचं ‘नोबेल’ देऊन तात्यांनाच आपण शांत करू.
(तिन्ही नेत्यांचं यावर एकमत होतं.)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.