
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७०चा असून, त्यांची कुंभ रास आहे. या राशीला साडेसाती असून, साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील पाच वर्षे साडेसाती सुरू असून, याच काळामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. २०१४ ते २०१९च्या तुलनेत २०२४नंतर त्यांना मिळालेले मुख्यमंत्रिपद त्यांच्यासाठी कटकटीचे ठरले आहे. पक्षाला आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असूनही, महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे.
राज्य सरकारला या काळात हिंदी भाषेच्या सक्तीवरून माघार घ्यावी लागली आहे. सध्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावरून सरकारवर नामुष्की आली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अन्य प्रकरणांवरून बराच काळ गोंधळ झाला. त्यापाठोपाठ आता मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे.
ग्रहयोगाचा विचार करता, सध्या साडेसातीशिवाय मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण कुंभ राशीच्या अष्टमातून सुरू असल्यामुळे मराठा आंदोलनाला सामोरे जाताना मोठी हतबलता दिसून येत आहे. मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत काळ मुख्यमंत्र्यांसाठी कटकटीचा ठरणार आहे. पण त्याचबरोबर सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण आणि २१ सप्टेंबरचे सूर्यग्रहण मुख्यमंत्री व महाराष्ट्रासाठी प्रतिकूल राहू शकते.
महाराष्ट्राची धनू रास असून, कन्या राशीचा मंगळ दशमात भ्रमण करीत असल्याने महाराष्ट्र व विशेषतः मुंबईमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या प्रतिकूल ग्रहणाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर होण्याची शक्यता आहे. सात ते २१ सप्टेंबर या काळात मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये अनुभवास येतील. याची तीव्रता १५ ऑक्टोबरपर्यंत राहू शकते. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्र्यांना जून २०२७पर्यंत साडेसाती असल्यामुळे, तोपर्यंत अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागेल. मात्र, जून २०२७नंतर केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असून, केंद्रातील राजकारणामध्ये फडणवीस यांचे महत्त्व वाढू शकते. आगामी काळात पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत फडणवीस यांचे अग्रक्रमाने येण्याची शक्यता वाटते.
सात सप्टेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून, दशम स्थानात कुंभ राशीत पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. दशमात चंद्र राहू, चतुर्थात रवी-केतू बुध, लग्नी हर्षल, धनस्थानी गुरू, तृतीयात शुक्र, पंचमात मंगळ व लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता राहूयुक्त पौर्णिमा दशमात होत असून, लाभातील शनी-नेपच्यून योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठे गोंधळ व नाट्यमय घटना होण्याची शक्यता वाटते.
चतुर्थातील रवी-केतू युतीमुळे मोठ्या पक्षात फूट पडेल. मोठ्या व्यक्तींचे राजीनामे होतील. सरकारी अधिकारी, मंत्री व प्रमुख व्यक्तींवर आरोप होऊन मोठ्या पदावरील व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील. पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडेल. या काळात नेतृत्वबदल, मंत्रिमंडळातील फेरबदल होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता राहील.
अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, दरड कोसळणे, भूस्खलन यातून मोठी हानी संभवते. विदर्भ-मराठवाडा या ठिकाणी; तसेच उत्तर भारतात मोठी दुर्घटना संभवते. कुंभ राशीतील पौर्णिमा वादळे, गॅसगळती, विषबाधा, यासाठी पूरक राहील. मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते.
मेष : मोठ्या व्यक्तींची मदत होईल. उत्तरार्धात मोठे खर्च होतील. प्रवासात त्रास संभवतो.
वृषभ : नवीन जबाबदारी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात पद मिळेल. जुने मित्र भेटतील.
मिथुन : धार्मिक-मंगल कार्यात अडथळे येतील. अडथळ्यांची शर्यत पार पाडावे लागतील.
कर्क : आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. वारसाहक्काच्या कामात अडचणी संभवतात.
सिंह : भागीदारीमध्ये कटकटी संभवतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्पष्टवक्तेपणामुळे वाद होतील.
कन्या : नोकरीमध्ये बदल किंवा बदली होईल. हाताखालचे लोक त्रास देतील. निदान न होणारे विकार, संसर्गजन्य विकार संभवतात.
तूळ : विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. शेअर्ससारख्या व्यवसायात निर्णय चुकल्याने मोठे नुकसान संभवते.
वृश्चिक : नोकरीमध्ये बदल-बदली होईल. घरातील ज्येष्ठांना त्रास संभवतो. वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
धनू : विरोधकांवर मात कराल. कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल. छोटे प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य बिघडेल.
मकर : आर्थिक व्यवहार जपून करावे. मोठे खर्च होतील. कुटुंबात समज-गैरसमज संभवतात. ल.
कुंभ : भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात. उत्तरार्धात मनाविरुद्ध खर्च होतील.
मीन : मोठे कर्ज मिळविण्यात अडथळे येतील. दूरचे प्रवास रद्द होतील. घरामध्ये धार्मिक कार्य, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.