सोलापूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या निवडणुकीत अत्यंत काठावर विजय मिळविलेल्या बदामी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष अन् काँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. काँग्रेसतर्फे वातावरण निर्मिती करण्यात सिद्धरामय्या यांनी मोठे यश मिळवले आहे, तर भाजपची सारी भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर आहे. (Siddaramaiah's test in Badami, while BJP leaders focus on Modi's meeting)
बागलकोट जिल्ह्यातील बदामी मतदारसंघात शांतगौडा पाटील (भाजप BJP), भीमसेन बाळप्पा चिमणकट्टी (काँग्रेस Congress) व हनुमंतप्पा माविनमरद (धर्मनिरपेक्ष जनता दल) हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. शिवरायप्पा जोगीन (आप) हेसुद्धा नशीब आजमावत आहेत. बदामी मतदारसंघात काँग्रेसचे सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी गेल्या निवडणुकीत केवळ एक हजार ६९६ मतांनी भाजपच्या बी. श्रीरामलू यांचा पराभव केला होता.
धनगर, वाल्मिकी व लिंगायत समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात एक लाख आठ हजार ५२४ पुरुष, तर एक लाख सहा हजार २९४ महिला मतदार (सरासरी ९७.९५) आहेत. विधानसभेच्या २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळप्पा भीमप्पा चिमणकट्टी यांनी जनता दलाच्या महांतेश ममदापूर यांचा पराभव केला होता. यावेळी भाजपचे उमेदवार महागुंडप्पा पट्टणशेट्टी तिसऱ्या क्रमांकावर होते. २००८ मध्ये मात्र भाजपने पट्टणशेट्टी यांच्या रुपाने या मतदारसंघात आमदारकी मिळवली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४१.२४ तर भाजपने ४०.२० टक्के मते मिळविली आहेत. कधी काँग्रेस, कधी जनता दल तर कधी भाजपच्या उमेदवाराने या मतदारसंघात विजयश्री खेचून आणल्याचा इतिहास आहे. कोणत्याही एका पक्षामागे येथील मतदार धावत नसल्याचे चित्र आहे.
बागलकोट, विजयपूर, बेळ्ळगी, कोल्हार, इंडी या मतदारसंघांपेक्षा बदामी येथे मात्र जीप-रिक्षांमधून प्रचार, रॅली, जाहीर सभेने चांगलीच वातावरण निर्मिती कली आहे. इलेक्शन ज्वर वाढला असला तरी मतदारसंघातील अन्य गावांच्या विकासाबाबत कुठेही चर्चा होताना दिसत नाही. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे उत्तम असले तरी पाणी, एखाद्या मोठ्या उद्योगातून रोजगारनिर्मिती, दिवाबत्ती याची अडचण आहे.
दोन महिन्यांपूर्वी सिद्धरामय्यांच्या सभेत तरुणांनी मोदींचा जयघोष केल्याने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ ओढवली होती. तर मंगळवारी (ता. २ मे) झालेल्या त्यांच्याच जाहीर सभेने गर्दीने उच्चांक गाठला होता. वातावरण निर्मितीत काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर वातावरण बदलेल, असा भाजपचा आशावाद आहे.
बदली कुठेही होवो; नोकरदारांची पसंती बदामीलाच
बदामी हे देशातील प्रमुख पुरातन वास्तूंच्या ठिकाणांपैकी एक क्षेत्र असल्याने नव्या योजनांना, बांधकामांना परवानगी नसल्याने विकास कामांना मर्यादा आहेत. तरीही रस्ते, पाणी, दिवाबत्ती या मूलभूत सुविधांची सोय चांगली आहे. बदामी येथील बनशंकरी देवस्थानामुळे वर्षभर भाविक व पर्यटकांची रेलचेल असल्याने स्थानिकांच्या हातांना काम आणि व्यापार तेजीत असतो. या मतदारसंघात नोकरदारांची संख्या सर्वाधिक आहे. बागलकोट जिल्ह्यात कुठेही बदली झाली तरीही सुखसोयींमुळे नोकरदारांची घरे व मतदार यादीतील नाव मात्र बदामीतच आहे.
लक्षवेधी
काँग्रसच्या माजी मंत्र्यांचा मुलगा रिंगणात
वातावरण निर्मितीत काँग्रेसची आघाडी
उमेदवारांची संपूर्ण भिस्त जातीच्या समीकरणावर
धनगर, वाल्मिकी, लिंगायत मतदारांचा प्रभाव
सुशिक्षित मतदारांचे प्रमाण ६९ टक्के
सिद्धरामय्या यांच्या रुपाने विरोधी पक्षनेतेपद
बाळप्पा चिमणकट्टी यांच्या रुपाने मंत्रीपद
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.