Andhra Pradesh News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंध्र प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी राज्य पिंजून काढत असून त्यांच्यासमोर तेलगू देसम, काँग्रेसचे आव्हान आहे. पण काल त्यांच्यावर प्रचारादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विजयवाडा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. जगनमोहन यांचा प्रचारानिमित्त रोड शो सुरू असताना त्यांच्या बसवर अचानक दगडफेक सुरू झाली. अंधार आणि गर्दीचा फायदा घेत काही जणांनी दगडफेक केली. यावेळी सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असलेल्या जगनमोहन यांच्या डोक्याला दगड लागला.
डोक्याला दुखापत झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचा रोड शो तातडीने थांबवण्यात आला. त्यानंतर त्यांना बसमध्येच डॉक्टरांकडून प्रथमोपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा प्रचार सुरूच ठेवला. जवळपास चार तास ते प्रचारात सहभागी झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘विजयवाडा येथील विवेकानंद स्कूल केंद्राजवळ मुख्यमंत्र्यांची बस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दिशेने दगड मारण्यात आले.’ दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर वायएसआर काँग्रेसने टीडीपीवर आरोप केला आहे.
वायएसआर काँग्रेसचे नेते हाफिज खान म्हणाले, ‘या घटनेमागे टीडीपीचा हात आहे. कारण मुख्यमंत्र्यांना मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसाद ते पाहू शकत नाहीत.’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगनमोहन यांची सध्या राज्यात यात्रा सुरू आहे. काल ते विजयवाडामध्ये होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) या घटनेची दखल घेत जगनमोहन यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना केली. टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाने या घटनेची पारदर्शकपणे चौकशी करून संबंधितांनावर कडक कारवाई करावी, असे नायडूंनी म्हटले आहे. भारत राष्ट्र समितीनेही या घटनेचा निषेध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.