

Justice Surya Kant oath taking : मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल दिले. त्याची देशभरात चर्चा झाली. आज जाता-जाता त्यांनी पुन्हा एकदा देशाचं मन जिंकलं. नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. त्यानंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
मावळते सीजेआय गवई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे कुटुंबीयही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधीनंतर नव्या सरन्यायाधीशांनी गवई यांची गळाभेट घेतली. निवृत्त सरन्यायाधीश गवई यांचा ५२ वे सरन्यायाधीश म्हणून आज कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी एक ऐतिहासिक पायंडा पाडला.
शपथविधीपूर्वी निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई सरकारी वाहनाने राष्ट्रपती भवनात दाखल झाले होते. पण घरी परतताना त्यांनी हे वाहन वापरले नाही. या कार्यक्रमानंतर नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासाठी त्यांनी हीच सरकारी गाडी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी उपलब्ध करून दिली. त्यानंतरच निवृत्त सीजेआय दुसऱ्या खासगी वाहनाने घरी निघून गेले. त्यांनी घरी परतताना सरकारी वाहनाचा वापर केला नाही.
निवृत्त सीजेआय गवई यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. त्यांनी एकप्रकारे हा ऐतिहासिक पायंडा पाडल्याची चर्चा आहे. या कृतीतून त्यांनी एक महत्वाचा संदेश दिला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून अधिकृत सरकारी बंगला सोडण्यासाठी विलंब होत असल्याचे समोर आले होते. आपल्या मुलींच्या वैद्यकीय कारणास्तव हा विलंब झाल्याचे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नसल्याचे गवई यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. अधिकाधिक काळ अमरावती, नागपुरात घालविणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आज त्यांनी याचा पुनरुच्चार करताना सांगितले की, निवृत्तीनंतर सरकारकडून कोणत्याही पदावरील नियुक्ती स्वीकारणार नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये अधिकाधिक वेळ तेथील आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी घालविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.