Supreme Court Updates : अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' उर्फ अरूण गवळी याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खून प्रकरणात अरूण गवळी शिक्षा भोगत आहे. पण, त्याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट कायद्याच्या कचाटीत सापडू शकते.
गवळीला देण्यात आलेल्या सुटीला महाराष्ट्र सरकारनं आक्षेप घेतला आहे. त्याविरोधात शिंदे सरकारनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयानं दर्शवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अरूण गवळी (Arun Gawli) याला हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण, वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेतून सूट दिली जाते. त्यानुसार अरूण गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर, 65 वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांना तुरूंगातून सोडता येईल. अरूण गवळीचा जन्म 1955 चा आहे. तो आत्ता 69 वर्षांचा आहे.
जामसंडेकर हत्या प्रकरणात अरूण गवळी 2007 पासून म्हणजे 16 वर्षांपासून तुरूंगात आहे. 2006 च्या परित्रपकानुसार सुटकेसाठीच्या दोन अटी अरूण गवळी पूर्ण करतो, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अरूण गवळीच्या सुटकेचे आदेश दिले होते.
न्यायालयात सुनावणी
नागपूर खंडपीठाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्वल भुयान यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीनं राजा ठाकरे यांनी युक्तिवाद केला.
"अरूण गवळीचे वय 71 ते 72 वर्षे आहे. आता तो काही ऐंशीच्या दशकातील गवळी राहिलेला नाही. तुम्हाला त्याच्या गुन्ह्याची तीव्रता आम्हाला पटवून द्यावी लागेल," असं न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितलं.
शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तुरूंगात
2 मार्च 2007 या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवकर कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणात अरूण गवळीला अटक झाली.
कमलाकार जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभरानं ही बाब उघड झाली होती की ही सुपारी अरूण गवळीनं दिली आहे. अरूण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता.
मुंबई पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यानुसार अरूण गवळीला कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी 30 लाख रूपये देण्यात होते. अरूण गवळीनं काम होईल, असा विश्वास सुपारी देणाऱ्या सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांना दिला होता. हे दोघे दगडी चाळीत आले होते. त्यांनी दगडी चाळीतच 30 लाख रूपये अरूण गवळीला दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.