New Delhi News : सुप्रीम कोर्टात (Supreme Court News ) शुक्रवारी एका अजब याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड याचिकाकर्त्यावर चांगलेच भडकल्याचे दिसले. आधी त्यांनी याचिकाकर्त्याला पाच लाख रुपये दंड ठोठावण्याचा इशारा दिला, पण त्यानंतर त्यांनीच दंड न आकारता पुन्हा अशा याचिका न करण्याबाबत ठणकावले.
आमदार (MLA) आणि खासदारांच्या प्रत्येक हालचालीवर डिजिटल माध्यमातून लक्ष ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. सुरिंदर कुंद्रा हे याचिकाकर्ते होते. याचिकेवरील सुनावणीच्या सुरुवातीलाच सरन्यायाधीश चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी वेळ वाया घालवल्याप्रकरणी पाच लाख रुपये दंड ठोठावण्याचा इशारा कुंद्रा यांना दिला होता.
सरन्यायाधीशांच्या या पवित्र्यानंतर कुंद्रा यांनी याचिकेचा उद्देश समजावून सांगण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्याची विनंती केली. कोर्टाकडून ही विनंती मान्य करण्यात आली. त्यानंतर संविधानाचा संदर्भ देत कुंद्रा म्हणाले, निवडणूक जिंकल्यानंतर खासदार आणि आमदार सत्ताधारी असल्यासारखे वागतात. त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी ते जिथे जातात तिथे सीसीटीव्ही (CCTV) बसवावेत. चोवीस तास त्यांच्यावर लक्ष राहायला हवे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी अजब मागणी कुंद्रा यांनी केली. त्यानंतर मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला 15 मिनिटे पूर्ण होण्याआधीच थांबवले आणि पुन्हा याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवू नये, असे ठणकावले.
कोणतेही खासदार किंवा आमदारावर डिजिटल (Digital) माध्यमातून कसे लक्ष ठेवता येईल? त्यांनाही खासगी आयुष्य असते. त्यामध्ये आपण ढवळाढवळ कसे करू शकतो? खासदार आणि आमदारांच्या हातावर आम्ही मायक्रोचिप बसवू का?, असा सवाल करत सरन्याधीशांनी भविष्यात अशी याचिका दाखल करू नये, असे याचिकाकर्त्याला सुनावले. तसेच याचिकाही फेटाळून लावली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.