Delhi News : मणिपूरमधील संघर्ष थांबवण्यासाठी काय-काय प्रयत्न केले याचे स्पष्टीकरण मागत मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधण्यात पुढाकार घेतला असून दुसरीकडे लोकसभेत सुळे मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट मणिपूर मुद्द्यावरून आमने-सामने आला आहे. (Latest Political News)
मणिपूरमधील दोन समाजातील वाद दोन महिन्यांपासून पेटत असल्याने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली जात आहेत. दोन महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोदींनी मणिपूरबाबत ३० सेंकद बोलले, यावरूनही आक्रमक विरोधकांनी लोकसभेत येऊन बोलावे असे आव्हान मोदींना केले आहे. यातच सुळे यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा मुद्दा सुळेंनी उपस्थित केला. देशभरात आरक्षण हा संघर्षाचा विषय झाल्याचा आरोप करताना सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका असो की मणिपूर येथील वांशिक हिंसाचार, यामागे आरक्षणाचाच मुद्दा आहे. मणिपूर येथील हिंसाचारात जून महिन्यात १४२ जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे. जुलै संपत आला तरी हा हिंसाचार थांबवण्याचे नाव घेत नाही. जवळपास ५४ हजार लोक विस्थापित झाले असून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे."
"देशाचा जगभरात गौरव वाढविणारी बॉक्सर मेरी कॉमच्या राज्यात महिलांप्रती झालेला हिंसाचार अतिशय गंभीर बाब आहे. महिलांना सरेआम गोळ्या मारल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. महिलांना विवस्त्र गावात फिरवले जाते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंसाचाराबाबत सरकारला तातडीने कारवाई करावी लागली. दरम्यान, सरकारनेही हा व्हिडिओ जास्त पसरु नये यासाठी प्रयत्न केले आहेत. तपास यंत्रणांनाही गुन्हे दाखल करुन आरोपींना गजाआड करण्यासाठी ७७ दिवस लागले. हा संघर्ष सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे," असा आग्रहही सुप्रिया सुळेंनी यावेळी केला.
भाजपला 'बेटी बचओ-बेटी पढाओ' या घोषणेवरून टोला मारताना सुळे म्हणाल्या, "ज्या भागात वांशिक हिंसाचार उसळला आहे त्या भागातील महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तसेच तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. मणिपूरला निर्भय महिलांचा वारसा आहे हे आपण विसरता कामा नये. त्यांच्यासोबत उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. 'बेटी बचेगी, तभी तो पढेगी' हे विसरता कामा नये."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.