

West Bengal CM : पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या भाजपनं आता या राज्यात आपला पहिला मुख्यमंत्री कोण असेल याची तयारी सुरु केली आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाव फायनल केलं आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही 'या' नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. उद्या हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
कोलकात्यात भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या बैठकीला अमित शहा यांनी देखील हजेरी लावली होती. यानंतर आता उद्या सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्याचबरोबर काही मंत्री देखील त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्यांची एक बैठक इथं आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मला आणि मोहनचरन मांझी यांना केंद्राकडून पर्ववेक्षक म्हणून आम्हाला पाठवलं होतं. काही दिवसांपूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्रीपदासाठी ८ प्रस्ताव आणि समर्थनाचं पत्र आमच्याकडं प्राप्त झालं आहे. हे सर्व प्रस्ताव एकाच नावाचे होते, त्यानंतर दुसऱ्या नावासाठी देखील सर्वांना पुरेसा वेळ देण्यात आला पण मुख्यमंत्रीपदासाठी दुसरं कोणतंही नाव पुढे आलेलं नाही. त्यामुळं केंद्रीय पर्ववेक्षकाच्या रुपानं मी सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे विधीमंडळ नेते म्हणून घोषित करतो.
पश्चिम बंगालमध्ये यंदा २०२६ मध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कारण या राज्यात भाजपला अनेकदा प्रयत्न करुनही सत्ता मिळवण्यात अपयश येत होतं. मात्र, यंदा ममता बॅनर्जींना १५ वर्षांच्या सत्तेतून खाली खेचत अखेर भाजपनं दमदार कामगिरी केली. इथं २९४ पैकी भाजपला २०७ जागांवर विजय मिळाला, तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानवं लागलं. यामध्ये सुवेंदू अधिकारी यांनी दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती, या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला. यांपैकी एका जागेवर त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांनाच पराभूत केलं.