2023 Assembly Elections Results in Marathi : राजस्थानातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सात व आरएलपीने एका खासदाराला निवडणूक रिंगणात उतरविले होते. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीतील त्यांच्या कामगिरीविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती.
चार मतदारसंघांत कमी मतदान झाल्याने काही जणांची झोप उडाली होती, तर चौघा जणांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला होता. राजस्थानात निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या तीन खासदारांना पराभवाचा धक्का बसला आहे.
विद्याधर नगर मतदारसंघातून भाजपच्या खासदार दिया कुमारी (Diya Kumari) ७१ हजार मताने विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या सीताराम अग्रवाल यांचा पराभव केला. झोतवारामधून भाजपचे खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काँग्रेसच्या अभिषेक चौधरी यांचा ५० हजार मतांनी पराभूत केले. अलवर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बालकनाथ यांनी तिजारा मतदारसंघातून काँग्रेसच्या इम्रान खान यांचा सहा हजार मताने पराभव केला होता.
मांडवा विधानसभेसाठी भाजपचे खासदार नरेंद्र कुमार रिंगणात उतरले होते. त्यांचा १८ हजार मताने कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार रिटा चौधरी यांनी पराभव केला. भाजपने किशनगड विधानसभेसाठी भगीरथ चौधरी यांना पसंती दिली होती. चौधरी सध्या अजमेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्याच्या नावाची घोषणा होताच भाजप नेते विकास चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या विकास चौधरी यांनी तीन हजार मतांनी भगीरथ चौधरी यांचा पराभव केला.
भाजपने सवाई माधोपूर विधानसभा मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार किरोरी लाल मीना २२ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार दानिश अबरार यांना चारी मुंड्या चित केले. खिवंसर मतदारसंघातून आरएलपीचे खासदार हनुमान बेनिवाल (Hanuman Benival) यांनी भाजपचे उमेदवार रेवंत रामा डांगा यांना दोन हजार मताने पराभूत केले.
तीन वेळा खासदार राहिलेले देवजी पटेल पराभूत
सांचोर विधानसभा मतदारसंघातून भाजपने देवजी एम. पटेल यांना उमेदवारी दिली होती. देवजी पटेल यांनी 2009, 2013 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि तिन्ही वेळा ते जिंकले होते. यावेळी त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अपक्ष उमेदवार जिवाराम चौधरी हे जॉइंट किलर ठरले. त्यांनी काँग्रेसच्या सुखराम बिष्णोई यांचा पराभव केला.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.