

West Bengal political news : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी हल्ला झाला. हा हल्ला तृणमूलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यानंतर रविवारीही पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. या घटनानंतर ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी रविवारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार-खासदारांची तातडीने बैठक बोलावली होती. मात्र, अनेक आमदार बैठकीला दाखल न झाल्याने ही बैठक रद्द करावी लागल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. पण ममता पुन्हा एकदा आपल्या जुन्या आक्रमक अवतारात दिसणार आहेत.
ममतांनी सरकारविरोधात शड्डू ठोकला असून येत्या २ जूनला सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यादिवशी कोलकातामधील ऐतिहासिक राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या राणी राशमोनी रोडवर हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो. याठिकाणी ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करणार आहेत. सरकारची धोरणे, निवडणुकीनंतर झालेली हिंसा आणि टीएमसी नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात त्या आवाज उठविणार आहेत. तर १ जून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.
आक्रमक अवतार
ममता बॅनर्जी या सुरुवातीपासूनच आक्रमक नेत्या मानल्या जातात. त्यांनी बंगालमध्ये अनेकदा रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आक्रमक आंदोलन केले आहे. नंदीग्राममधील आंदोलन त्याकाळी प्रचंड गाजले होते. या आंदोलनामुळे त्यांना सत्ता मिळाली होती, असे सांगितले जाते. आता सत्ता गेल्यानंतर त्यांनी पुन्हा आक्रमक होत सरकारविरोधात मोर्चा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील स्थिती सध्या संवेदनशील मानली जात आहे. अशा स्थितीत ममतांनी आक्रमक होत सरकारविरोधात एल्गार पुकारल्याने ही स्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे. टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यास हिंसाचार आणखी वाढू शकतो. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यानंतर आधीच टीएमसी कार्यकर्ते संतापले आहेत. त्यामुळे येत्या २ जूनला ममतांच्या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.