Cash and Query Case : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर पक्षाच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या निर्णयावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना इंडिया आघाडीचे आभार मानले आहेत. भाजपने लोकशाहीचा विश्वासघात केल्याची टीका ममतांनी केली आहे.
मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर तासाभरातच ममतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, भाजपने आज लोकशाहीचा, संविधानिक हक्कांचा विश्वासघात केला आहे. 90 टक्के भाजपचे सदस्य असलेल्या समितीने आज 495 पानांचा अहवाल सादर केला. हा अहवाल वाचण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या सदस्यांसह इतर सर्व सदस्यांना केवळ 30 मिनिटे वेळ देण्यात आला. महुआ यांना आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इंडिया आघाडीचे आभार मानताना ममता म्हणाल्या, ‘लोकसभेमध्ये इंडिया आघाडी एकजूट राहिली. त्यांनी एकत्रितपणे हा मुद्दा उपस्थित केल्याने मी सर्व सदस्यांचे आभार मानते. आमचा पक्ष, सर्व कार्यकर्ते महुआ यांच्यासोबत आहेत.’ दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याडून लाच म्हणून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी याबाबत तक्रार केली होती.
काय घडलं आज?
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये मोईत्रा यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यांची कृती अनैतिक आणि संसदीय सदस्य म्हणून अयोग्य होती. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली होती. अहवाल लोकसभेत सादर केल्यानंतर त्यावर विरोधकांनी मोठा गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मोईत्रा यांना या प्रकरणी आपली बाजू मांडू देण्याची मागणी केली, पण अध्यक्ष बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर झाला.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.