

TVK News : तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी एका एका आमदाराचे मत महत्त्वाचे आहे. अशात मद्रास हायकोर्टाने त्यांच्या टीव्हीके पक्षाला मोठा धक्का दिला आहे. तिरुप्पात्तूर मतदारसंघातून केवळ एका मताने विजयी झालेल्या टीव्हीके पक्षाच्या श्रीनिवास सेतुपती यांना हायकोर्टाने मतदानापासून रोखले आहे. सेतुपती यांना आता विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान करता येणार नाही.
श्रीनिवास सेतुपती यांनी तिरुप्पात्तूर मतदारसंघातून डीएमकेचे उमेदवार पेरीयकरुप्पन यांचा अवघ्या एका मताने पराभव केला होता. या निकालावर आक्षेप घेत पेरीयकरुप्पन यांनी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. सेतुपती यांना मतदानापासून रोखावे अशी मागणी पेरीयकरुप्पन यांनी केली होती. डीएमके उमेदवाराच्या याचिकेवर रविवारी तातडीची सुनावणी पार पडली होती.
तिरुप्पात्तूर मतदारसंघातील काही टपाली मते दुसऱ्या मतदारसंघात गेली. ही मते तिरुप्पातूर मतदारसंघात पाठविण्याऐवजी तिथे अवैध ठरविण्यात आली. ही टपाली मते या मतदारसंघात पाठविली असती तर निकाल वेगळा लागला असता, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोर्टाकडून याबाबत निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.
आयोगाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले की, नियमांनुसार, मतमोजणी सुरू झाल्यानंतर टपाल मतदानातील विसंगतींबाबत तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नसते. आयोगाने पुढे असेही नमूद केले की, एकही टपाली मत दुसऱ्या मतदारसंघात वर्ग करण्यात आलेले नाही.
मात्र पेरीयकरुप्पन यांनी सादर केलेल्या तक्रारीला पुष्टी देणारे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सेतुपती यांना विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावात आमदार म्हणून सहभागी होण्यापासून रोखले आहे. तसेच, सर्व टपाली मते सुरक्षितपणे जतन करून ठेवावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. याव्यतिरिक्त, या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ फूटेज देखील जतन करून ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विजय बहुमत सिद्ध करू शकतात का?
सध्या तामिळनाडू विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून बुधवारी विजय यांना बहुमत सिध्द करावे लागणार. यापूर्वी विजय यांनीही दोनपैकी तिरुचिरापल्ली मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे टीव्हीकेची संख्या 107 वर आली होती. आता आणखी एका आमदाराला मतदान करता येणार नसल्याने त्यांची संख्या 106 पर्यंत खाली आहे.
विजय यांना काँग्रेसचे 5, माकप 2, भाकप 2, व्हीसीके 2 आणि आयएमयुएल पक्षाच्या 2 अशा 13 आमदारांचा पाठिंबा आहे. 106 + 13 = 119 आमदारांचे संख्याबळ विजय यांच्या पाठिशी आहे. दोन आमदारांचे संख्याबळ कमी झाल्याने बहुमताचा आकडाही 117 पर्यंत खाली आला आहे. थोडक्यात बहुमतापेक्षा हा आकडा दोनने अधिक आहे. त्यामुळे विजय हे बहुमत सिध्द करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.