उमेदवारीवरुन भाजपमध्ये वाद! खासदारकीच्या नादात आमदारकीही जाणार?

पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं असून, भाजपमध्ये आता वाद उफाळून आला आहे.
BJP
BJPSarkarnama

कोलकता : असनसोल लोकसभा पोटनिवडणुकीवरून (Loksabha Byelection) पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने बॉलीवूडमधील हस्ती असलेल्या अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांना मैदानात उतरवलं आहे. परंतु, आता त्यांच्या उमेदवारीवरूनच भाजपमध्ये वाद उफाळला आहे. खासदारकीच्या नादात आमदारकीवरही पाणी सोडावे लागेल, असा इशारा भाजपमधील नेत्यांनीच दिला आहे.

आमदार असलेल्या अग्निमित्रा पॉल यांना लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास भाजपमधील एका गटाने जाहीरपणे विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत भाजपला मोठा फटका बसला आहे. याचबरोबर काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांतही तृणमूलने बाजी मारली आहे. यामुळे विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नये, अशी भूमिका पक्षातील काही नेत्यांनी घेतली आहे. पॉल या लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आमदारकीची पोटनिवडणूक होऊ शकते. असे झाल्यास भाजपला यश मिळण्याचा भरवसा नाही. यामुळे भाजपचे संख्याबळ आणखी कमी होऊ शकते. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकांत एकाही ठिकाणी भाजपला विजय मिळालेला नाही. निसिथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार या दोन खासदारांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला होता. नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला होता. यामुळे भाजपचे संख्याबळ कमी झाले होते.

अग्निमित्रा पॉल या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि कलाकारांसाठी फॅशन डिझायनिंग केलं आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्षभरातच म्हणजे 2020 मध्ये पक्षाने त्यांच्या भाजप महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षाची जबाबदारी टाकली. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना असनसोल दक्षिण मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता. आता भाजपने त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. बॉलीवूडचा भाग असलेल्या अग्निमित्रा यांचा आता शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी सामना होणार आहे.

BJP
मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटेना; दोन्ही दावेदार वेगवेगळ्या विमानांनी पुन्हा मोदींच्या दरबारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्विटरवरून शत्रुघ्न सिन्हा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. सिन्हा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. मागील वर्षी जुलै महिन्यात ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. पण त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नव्हता. आता ममतांनी त्यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवत काँग्रेसला धक्का दिला आहे.

BJP
नानांना निवडून आणण्याची जबाबदारी पाटलांनी टाकली महाडिक, चिकोडे अन् जाधवांवर

बंगालमधील एक लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांनाही विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. बालीगंज विधानसभा मतदारसंघातून ते तृणमूलचे उमेदवार असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com