
Impact on Russian Military Capabilities : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील काही दिवसांपासून शीतयुध्द सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर छोटे हल्ले केले जात होते. यामध्ये बलाढ्य रशियासमोर छोटे राष्ट्र असलेले युक्रेन कधीच झुकले नाही. त्याचा प्रत्यय रविवारी आला असून युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे.
युक्रेनच्या स्पेशल फोर्सने रशियावर एअरस्ट्राईक करत रशियाच्या तब्बल 41 लढाऊ विमानांना नेस्तनाबूत केले आहे. रशियाच्या हवाई तळावर ड्रोनच्या माध्यमातून युक्रेनने केलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. ही तिसऱ्या महायुध्दाची तर नांदी नाही ना, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. रशियानेही युक्रेनचे शेकडो ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
युक्रेनच्या या हल्ल्याची तुलना आता पर्ल हार्बरवरील हल्ल्याशी केली जात आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात डिसेंबर 1941 मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केला होता. जपानने ओआहू येथे असलेल्या अमेरिकन नौदलाच्या पर्ल हार्बर तळावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्याची इतिहासात नोंद झाली होती.
यावेळी युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून रशियाच्या हवाई दलाच्या तळांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे ही लढाऊ विमाने ड्रोनच्या मदतीने उडविण्यात आली. हवाई सुरक्षा यंत्रणांपासून बचावासाठी युक्रेनने काही कंटेनर्समधून हे ड्रोन हवाई तळापर्यंत पोहचवली होती. तिथून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ड्रोन व हल्ले नियंत्रित करण्यात आले. पाच हवाई तळांवर अचानक हा हल्ला करत युक्रेनने रशियाच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
ड्रोन वॉर
युक्रेनच्या या ऑपरेशन स्पायडर वेबमुळे भारतासह जगालाही धडा मिळाला आहे. आता ड्रोन वॉरचा जमाना असल्याचा संदेश या हल्ल्याने दिला आहे. युक्रेनने शत्रूला चकवा देत हल्ला करण्यासाठी ड्रोनचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्याचे या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये 2022 पासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चाही सुरू आहे. सोमवारीही चर्चा होणार होती. त्याआधीच हल्ला करत युक्रेनने रशियावर दबाव वाढवला आहे. आम्ही माघार घेणार नाही, असाच संदेश युक्रेनने दिला आहे.
तिसऱ्या महायुध्दाची भीती
रशियानेही युक्रेनवर पलटवार केल्यास तिसरे महायुध्द सुरू होण्याची भीतीही दुसरीकडे व्यक्त केली जात आहे. रशियाचे मागील तीन वर्षांतील सर्वात मोठे नुकसान झाले आहे. ज्या विमानांद्वारे युक्रेनवर हल्ला केला जात होता, तीच विमाने नेस्तनाबूत झाली आहे. त्याचा बदला रशिया घेऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
बड्या देशांना सूचक इशारा
युक्रेनच्या हल्ल्यामुळे बड्या देशांनाही एक सूचक संदेश गेला आहे. तीन वर्षांपासून रशियासारख्या बलाढ्य देशाला झुंजवत ठेवले आणि आता सर्वात मोठा हल्ला केला. त्यामुळे आता छोटे देशही युध्दासाठी सज्ज असल्याचा संदेश युक्रेनने दिला आहे.
भारतासाठीही संदेश
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले होते. पण भारताने ते परतवून लावले होते. युक्रेनने गनिमी कावा करत रशियावर हल्ला केला आहे. 2021 मध्येही पाकिस्तानने जम्मूतील भारतीय हवाई तळावर हल्ला केला होता. त्यावेळी दोन ड्रोनच्या माध्यमातून स्फोटके टाकण्यात आली होती. मात्र, त्यावेळी दहशतवाद्यांना निशाणा चुकला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.