
India’s Role in Regional Stability : अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करत जगात खळबळ उडवून दिली आहे. इराणनेही आता चर्चा नाही तर दुरगामी परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे इराण आणि इस्त्राईल युध्दातमध्ये तेल ओतण्याचे काम अमेरिकेने केल्याची भावना जगातील अनेक देशांची झाली आहे. आतापर्यंत अलिप्त असलेल्या सौदी अरेबियानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानसह काही मुस्लिम देशांनी इराणची बाजू घेत हल्ल्याला विरोध दर्शवला आहे. त्यातच आता एक महत्वाची घडामोड घडली आहे. हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्यामध्ये दुरध्वनीवरून चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनीच याबाबत माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्रपतींशी माझी चर्चा झाली. सध्याच्या स्थितीवर विस्ताराने बोलणे झाले आहे. मी सध्याच्या संघर्षावर तीव्र चिंता व्यक्त केली आणि तणाव तात्काळ कमी करण्यासाठी संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पुन्हा केले. शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी आग्रह केल्याचे पंतप्रधानीं म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्रपतींमधील ही चर्चा अमेरिकेसाठी इराणने एकप्रकारे सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. इराणच्या राष्ट्रपतींनी स्वत:हून मोदींना फोन केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. राष्ट्रपतींनी मोदींना सध्याच्या स्थितीबाबत माहिती दिली. दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटे चर्चा सुरू होती. राष्ट्रपतींनी शांतता, सुरक्षा आणि स्थितता आणण्यात भारतासारखा मित्र आणि भागीदार असल्याचे सांगत पंतप्रधानांचे आभारही मानले. भारताची भूमिका त्यासाठी महत्वाचे असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, इराण आणि इस्त्राईलमधील संघर्षानंतर इराणच्या राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच पंतप्रधानांशी संवाद साधला. त्यातही अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हा संवाद झाला आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध अत्यंत चांगले आहेत. इराण हा नेहमी पाकिस्तानचा मित्रदेश मानला जातो. यापार्श्वभूमीवर इराणच्या डिल्पोमसीने अमेरिकेलाही धक्का बसला आहे. इराण आणि इस्त्राईलच्या संघर्षामध्ये भारताची थेट काहीही सहभाग नसला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या भूमिकेला महत्व आहे.
भारताचा विरोध असूनही ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना मेजवानी दिली होती. त्यानंतर पाकिस्तावर माझे प्रेम असल्याचे विधानही त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात भारताक रोष व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांचे अमेरिकेला येण्याचे निमंत्रणही नम्रपणे नाकारले होते. यापार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींमध्ये जवळपास पाऊणतास झालेल्या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.