डेहराडून : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असा सामना राज्यात सुरू आहे. आता मतदानाला आठवडा राहिलेला असताना भाजपने अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) राज्याचा ब्रँड अॅम्बेसिडर बनवण्याची खेळी खेळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अक्षय कुमारच्या लोकप्रियतेच्या फायदा घेण्याची चाल भाजपने खेळली आहे.
अक्षयने आज मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर धामी यांनी अक्षय कुमारला राज्याचा ब्रँड अॅम्बेसिडर घोषित केले. ते म्हणाले की, प्रसिद्ध अभिनेता, युवकांचे प्रेरणास्त्रोत आणि माझे मित्र अक्षय कुमार यांचे मुख्यमंत्री निवासात मी आज स्वागत केले. राज्यातील युवकांना प्रेरित करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे अक्षय कुमार यांनी कौतुक केले. याचबरोबर भविष्यात सरकारला सहयोग करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यासोबतच्या भेटीत विधानसभा निवडणुकीसाठी धामी यांना अक्षयने शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीनंतर अक्षयने उत्तराखंडची एक छोटी व्हिडीओ क्लिपही सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने म्हटले आहे की, आणखी प्रेम करण्यासाठी काय हवे. आपण उत्तराखंडला देवभूमी विनाकारण म्हणत नाही. जगातील अनेक सुंदर ठिकाणी चित्रीकरण केले पण मसुरीची गोष्टच वेगळी.
राज्यातील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्याआधी आठवडाभर अक्षयची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अक्षयच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. तरुणांना भाजपकडे ओढून घेण्यासाठी अक्षयचा उपयोग होईल, अशी आशा पक्षाला वाटत आहे. यामुळेच तडकाफडकी अक्षयवर सरकारने ही जबाबदारी सोपवली आहे.
भाजपने उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केलेले नाही. मात्र, राज्यातील निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसमध्येही अशीच स्थिती आहे. पक्षाने माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते हरीश रावत यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उमेदवारी दिली नसली तरी पक्ष राज्यात रावत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बंडखोर नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. प्रत्यक्षात राज्यातील अनेक जागांवर भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागत असून त्यामुळे पक्षाचे गणित बिघडले आहे. पक्षाकडून बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.