नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पुर्वसंध्येला केंद्र सरकारने मंगळवारी पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली. यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पण आता या पुरस्कारांवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांनाही केंद्र सरकारने (Central Government) पद्म भूषण पुरस्कार जाहीर केला. पण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन तासात पुरस्कार नाकारला आहे. पुरस्काराबाबत आपल्याला कळवलेच नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
त्यातच आता 90 वर्षांच्या प्रसिध्द बंगाली गायिकेने पुरस्कार नाकारल्याचे समोर आले आहे. बंगालमधील प्रसिध्द गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता. पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला. पद्म पुरस्कार नाकारणारे दोघेही बंगालमधील आहेत. मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. आईनेच हा पुरस्कार स्वत:हून नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
'नव्वदाव्या वर्षी तिच्यासारख्या महान गायिकेला पदश्री पुरस्कार देणं, अपमानजनक आहे. पुरस्कार नाकारण्यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही. राजकारणापासून आई कोसो दूर आहे. त्यामुळे यामागे कोणतेही राजकीय कारण शोधू नये. तिला अपमानजनक वाटल्याने पुरस्कार नाकारला,' असेही सेनगुप्ता यांनी स्पष्ट केला. मुखर्जी यांनी हजारो बंगाल गाणी गायली असून इतर डझनभर भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना 2011 मध्ये बंगालमधील सर्वोच्च बंग भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. 1970 मध्ये त्यांना सर्वोच्च चित्रपट गायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार -
जेष्ठ गायिका प्रभा आत्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.
पद्मभूषण पुरस्कार -
१. गुलाम नबी आझाद, २. व्हीक्टर बॅनर्जी, ३. गुरमित बावा (मरणोत्तर), ४. बुद्धदेव भट्टाचार्य, ५. नटराजन चंद्रशेखरन, ६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला, ७. मधुर जेफरी, ८. देवेंद्र झांजरीया, ९. राशीद खान, १०. राजीव मेहेरश्री, ११. सुंदरंजन पिचाई, १२. सायरस पुनावाला, १३. संजया राजाराम (मरणोत्तर), १४. प्रतिभा रे, १५. स्वामी सच्चिदानंद, १६. वशिष्ठ त्रिपाठी
पद्मश्री पुरस्कार -
एकूण १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सन्मान होणार आहे. यात डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर), हिंमतराव बाविस्कर, सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे, सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.