पणजी : गोवा विधानसभा निवडणूक निकालात तब्बल २० जागा जिंकत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर ३ अपक्ष आणि महाष्ट्रवादी गोमन्तक पक्षाच्या २ आमदारांचा पाठिंबा मिळवला. मात्र निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवस उलटले तरी भाजपने (BJP) सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सस्पेन्स वाढला होता. पण काल अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. ते येत्या २८ मार्च रोजी भव्य-दिव्य सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
या सगळ्या घडामोडी एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांना मुख्यमंत्री पदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची इच्छा घेवून राणे अमित शहा (Amit Shah) यांना भेटले होते. तेव्हा त्यांनी राणे यांना काम सुरू ठेवा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता १० दिवसांच्या सस्पेन्समध्ये विश्वजीत राणे यांनीही काही राजकीय संदेश देत आणि दबावतंत्राचा वापर करत आपण देखील शर्यतीमध्ये असल्याचे दाखवून दिले होते फिल्डिंगसाठी त्यांनी दिल्लीही गाठली होती. पण काल डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा करण्यात आली.
पण राणे यांच्यासाठी एकच दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांना आता सावंत यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आणि अन्य महत्वाची खाती मिळणार आहेत. यापूर्वी पर्रीकर मंत्रिमंडळात राणे यांचे स्थान दहावे होते. त्यानंतर आलेल्या सावंत यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना ज्येष्ठता प्राप्त झाली नव्हती. खाती देखील उद्योग आणि आरोग्य यांसारखी होती. यामुळे ते काहीसे अस्वस्थ बनले होते. यावेळी मात्र राणे यांनी दिल्लीपर्यंत धडक देऊन अमित शहा व विशेष करून महाराष्ट्राचे नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात स्वतःबद्दल निश्चित जागा निर्माण केली आणि आपली पत वाढवून घेतली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्रीपद सावंतांना आणि झुकतं माप राणेंना असं चित्र असणार आहे. गोव्यात २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विविध भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यादिवसी सावंत यांच्यासह ७ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.