

West Bengal politics : जेमतेम दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ‘जोर का झटका’ दिला आहे. निवडणुका जवळ आल्या की इतर पक्षांतील बड्या नेत्यांना, आमदार-खासदारांना आपल्या पक्षात घेण्याची चढाओढ सुरू असते. पण ममतादीदींनी तसे न करता भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी राजकीय खेळी खेळली आहे. अर्थातच याचे कनेक्शन थेट भाजपशी आहे.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी राज्यातील २५ प्रतिष्ठित मान्यवरांना विविध पुरस्कार देत त्यांचा गौरव केला. यामध्ये संगीत, गायनासह राजकीय क्षेत्रातील काहींचा समावेश होता. बंगालमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बंग विभूषण’चाही समावेश आहे. ममतादीदींनी हा पुरस्कार चक्क भाजपचे खासदार नागेन रॉय यांना प्रदान केला आहे.
मातृभाषा दिनी शनिवारी झालेल्या या सोहळ्यामध्ये अनंता महाराज म्हणून प्रसिध्द असलेल्या नागेन रॉय यांनी उत्साही वातावरणात या पुरस्काराचा ममतादींच्या हस्ते स्वीकार केला. त्यामुळे आता पुरस्काराचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटू लागले आहेत. रॉय हे भाजपच्या कोट्यातून २०२३ मध्ये नामनिर्देशित केलेले राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच ते उत्तर बंगाल प्रांतातील राजवंशी समाजातील मोठे नाव आहे. यातच मोठे राजकारण दडले आहे.
बंगालमध्ये भाजप आणि ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये ३६ चा आकडा आहे. पण त्यानंतर त्यांनी रॉय यांना पुरस्कार दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. पण दीदींचे यामागे मोठे राजकारण असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. रॉय हे ज्या समाजातील येतात, तिथे भाजपने आपली पकड मजबूत केली आहे. तर तृणमूलला त्यांची मते मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या काही निवडणुकांमध्ये असेच चित्र दिसून आले.
कार्यक्रमात बोलताना ममतादीदींनी काही सूचक विधानांमधून तसे संकेतही दिले. अनंता महाराज यांना पुरस्कार दिल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. राजवंशी भाषा आणि संस्कृतीचा हा सन्मान आहे. या समाजासाठी त्यांनी पुढे काम करत राहावे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. या समाजासाठी सरकारकडून केल्या जात असलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.
पुरस्कारानंतर रॉय हे टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली. मी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे का तर नाही. आता काही शक्यता आहे का तर नाही. मला यामध्ये काहीही स्वारस्य नाही, असे रॉय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बंगालमध्ये २०११ च्या जनगणनेनुसार, राजवंशी समाजाची लोकसंख्या सुमारे ३३ लाख एवढी आहे. उत्तर आणि मध्य बंगालमध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आसामधील पाच-सहा जिल्ह्यांमध्येही या समाजातील लोकांचे लक्षणीय अस्तित्व आहे. विशेष म्हणजे आसाममध्येही निवडणूक होणार आहे. त्यामध्येच ममतादीदींनी टायमिंग साधत भाजपवर मात केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.