

Voter list update West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिलला आहे. पहिल्या टप्प्याच्या पाच दिवस आधीच आयोगाने मतदारयादीमध्ये सुमारे सात लाख नवे मतदार समाविष्ट केले आहेत. त्यामुळे राज्यातील मतदारांचा आकडा वाढला आहे.
आयोगाच्या सुधारित मतदारयादीनुसार आता राज्यात मतदारांची संख्या ६ कोटी ८२ लाख ५१ हजार ८ एवढी झाली आहे. आयोगाने अद्याप नवीन मतदारांचे वय, लिंग आणि अन्य माहिती जाहीर केलेली नाही. या मतदारांपैकी ३ लाख २२ हजार मतदार पहिल्या टप्प्यात तर ३ लाख ८८ हजार मतदार दुसऱ्या टप्प्यात मतदान करतील.
मतदारयादीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांमध्ये मतदारयादी पुनर्पडताळणी म्हणजेच SIR मध्ये वगळण्यात आलेल्या मतदारांचाही समावेश आहे. त्यांच्या हरकतीनंतर ही नावे समाविष्ट करण्यात आल्याचे समजते. एसआयआरच्या माध्यमातून तब्बल ९० लाख नावे वगळण्यात आली होती. दरम्यान, यादीमध्ये सात लाख नावे जोडण्यात आल्याने त्याचा कमी-अधिक परिणाम सर्वच मतदारसंघांवर होणार आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने नावे वगळण्यावरून थेट केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आपल्या पक्षाच्या समर्थकांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता नावे समाविष्ट करण्यात आल्याने तृणमूलला अधिक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही मतदारसंघात वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे तृणमूलकडून हे षडयंत्र असल्याचा आरोप केला जात होता. तब्बल ९० लाख नावे वगळण्यात आल्याचा फटका तृणमूलला बसण्याची भीती व्यक्त केली जात होती. याविरोधात खुद्द ममतादीदींनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.