
New Delhi News : तमिळनाडूतील डीएमके सरकारविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी एल्गार पुकारला आहे. आपल्या विरोधाची धार अधिक तीव्र करत त्यांनी गुरूवारी मोठी घोषणा केली. एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतापलेल्या अण्णामलाई यांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच आपल्या पायातील बुट काढून हातात घेतले. डीएमके सरकारचा पाडाव होईपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.
कोइंम्बतूर येथील आपल्या घराबाहेर स्वत:ला चाबकाचे सहा फटके मारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहेत. तसेच भगवान मुरुगन यांच्या सहा पवित्र धार्मिक ठिकाणांची यात्र करत 48 दिवस उपवास करणार असल्याचेही अण्णामलाई यांनी यावेळी सांगितले. अण्णामलाई यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे खळबळ उडाली आहे. अण्णामलाई यांच्याकडे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जाते.
अण्णामलाई यांनी पत्रकार परिषदेत डीएमके सरकारवर गंभीर आरोप केले. अण्णा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीचे डीएमके नेत्यांशी संबंध असल्याने ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अण्णामलाई यांनी पोलिसांवरही आरोप केले. पोलिसांनी एफआयआर सार्वजनिक करून पीडितेची ओळख उघड केली. पीडितेची बदनामी झाल्याचे सांगताना अण्णामलाई यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी अचानक पायातील बुट काढून हातात घेतले. जोपर्यंत डीएमके सरकारला सत्तेतून बाहेर काढत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी घोषणा त्यांनी केले.
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारात एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना 23 डिसेंबरला घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून भाजपने सत्ताधारी डीएमकेला घेरले आहे. आरोपी ज्ञानसेकरन हा डीएमकेच्या विद्यार्थी संघटनेचा एका क्षेत्राचा उपसंयोजक असल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.