Delhi News : आगामी काळात होत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसोबतच या वर्षाअखेरीस तेलंगणा आणि मिझोराम या भारतीय राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे राजकीय चुरस वाढली आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवण्याच्या दृष्टीने या राज्यांचा विधानसभांचा निकाल महत्वपूर्ण मानले जाणार असल्याचे मत, राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केली आहे. दोन राज्यांतील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत आघाडी घेतली आहे. काँग्रेसने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी, भाजपने निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी मध्य प्रदेशातील ३९ आणि छत्तीसगडमधील २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. छत्तीसगडमध्ये ९० तर राजस्थानमध्ये २०० विधानसभेच्या जागा आहेत.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवला होता. या राज्यांमध्ये कोणतीही तिसरी राजकीय शक्ती नसताना काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच मुख्य लढत होत आहे.
छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेसची सरकारे पाच वर्षे टिकली असताना, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार तेव्हा पडले गेले, जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केले आणि त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २२ आमदार भाजपात सामील झाले होते. सरकार पडल्यानंतर मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत आला. आता मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष असेल, कारण निकाल लागताच आगामी लोकसभा निवडणुकीत काय घडणार, याचे काही संकेत मिळू शकतील.
काँग्रेस नेते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात रस्सीखेच सुरू असताना राजस्थानचे राजकारण एका रंजक वळणावर आले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांना भाजपने कोणत्याही निवडणूक समितीपासून दूर ठेवले आहे. दोन्ही प्रमुख संघटनांमधील अंतर्गत कलह आता जनतेसमोर आले आहे.
त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसोबतच तेलंगणा आणि मिझोराम या भारतीय राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या विधानसभा निवडणूक निकालावरूनच २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरविण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जात असल्याने सर्वांचे याकडे लक्ष असणार आहे. या राज्यातील करण्यात आलेल्या निवडणूकपूर्व सर्वेचे संभाव्य निकाल वेगवेगळे असले तरी प्रत्यक्षात काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.