Mahesh Landge: भाजपच्या पैलवान आमदाराचा काय आहे फिटनेस फंडा?

MLA Mahesh Landge Fitness Funda:पैलवानीचा वारसा लाभलेले महेश लांडगे शालेय जीवनापासून कुस्तीसारख्या पारंपरिक खेळामध्ये सक्रिय होते. आजही, आमदार म्हणून व्यग्र दिनचर्या असतानाही दररोज सकाळी ५.३० वाजता उठून व्यायाम करणं हा त्यांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे.
MLA Mahesh Landge Fitness Funda
MLA Mahesh Landge Fitness FundaSarkarnama
Published on
Updated on

📝 3-पॉईंट

  1. फिटनेसप्रेमी आमदार: भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे कुस्तीपटू असून त्यांच्या दैनंदिन शिस्तबद्ध व्यायामामुळे युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत.

  2. कुस्तीचा वारसा आणि संस्थात्मक योगदान: त्यांनी भोसरीत भवानी तालीमएमडी फिटनेस आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारून पारंपरिक आणि आधुनिक कुस्ती प्रशिक्षणासाठी आदर्श पायाभूत सुविधा निर्माण केल्या.

  3. आरोग्य आणि आहारशिस्त: व्यायामाबरोबर संतुलित आहार आणि गोसेवा यांमधून ते सकारात्मक ऊर्जा मिळवतात, हेच त्यांच्या यशस्वी राजकीय प्रवासाचे गुपित आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक ते आमदारपदापर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण करणारे भारतीय जनता पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांचा फिटनेस युवकांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रांत दमदार कामगिरी करणारे आमदार लांडगे पैलवान आहेत. शारीरिक तंदुरुस्ती ही त्यांच्या यशामागील एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे, असे ते सांगतात.

पैलवानीचा वारसा लाभलेले महेश लांडगे शालेय जीवनापासून कुस्तीसारख्या पारंपरिक खेळामध्ये सक्रिय होते. आजही, आमदार म्हणून व्यग्र दिनचर्या असतानाही दररोज सकाळी ५.३० वाजता उठून व्यायाम करणं हा त्यांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. सूर्यनमस्कारांनी दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी सहा वाजता ते जिममध्ये हजर असतात.

शालेय जीवनात आमदार लांडगे यांनी कोल्हापूर येथील तालमीमध्ये सराव केला आहे. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात त्यांची ‘पैलवान’ अशीच ओळख आहे. यासह भोसरीमध्ये भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांमुळे लांडगे यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाला नवीन दिशा मिळाली, असे सांगितले जाते.

जिममध्ये ट्रेडमिलवर साधारण तीन किलोमीटर चालणे, त्यानंतर चार किलोमीटर धावणे, जोर, बैठका, सायकलिंग, वेट ट्रेनिंग यांसारख्या अत्याधुनिक व पारंपरिक व्यायामांचा ते सातत्याने सराव करतात. आठवड्यातील सातही दिवस व्यायाम करणे, हा त्यांचा नियम आहे. रविवारी दिघीच्या डोंगरावर चढणे, आणि वेळ मिळेल तेव्हा पोहणे हे त्यांच्या फिटनेस रुटीनचे वैशिष्ट्य आहे.

व्यायाम म्हणजे दिवसभराची ऊर्जा

आमदार लांडगे धकाधकीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातही ते आरोग्याबाबत कुठलीही तडजोड करत नाहीत. ''दैनंदिन व्यायाम आणि संतुलित आहार हाच माझा फिटनेस मंत्र आहे'', असं ते आवर्जून सांगतात. बाहेरगावी दौऱ्यावर असतानाही चालणे आणि व्यायाम चुकवत नाहीत. विशेष म्हणजे, गोमाता संवर्धनासाठी काम करणारे महेश लांडगे यांचा मोठा गोठा आहे. शेतावर गेल्यावर मोकळ्या वातावरणात राहणे आणि गाई-गुरांच्या सानिध्यात सकारात्मक ऊर्जा मिळवणे, यावर नेहमीच त्यांचा भर असतो. किंबहुना, सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवणारे महेश लांडगे शेतकरी, शर्यतप्रेमींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

MLA Mahesh Landge Fitness Funda
Nanded Politics: युतीत समन्वय; आघाडीत गोंधळ! नांदेडमध्ये पक्ष पुनर्बांधणीसाठी नेत्यांची धावाधाव

संतुलित आहार – आरोग्याचा पाया

आहाराच्या बाबतीत आमदार महेश लांडगे शिस्तशीर आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही अन्नपदार्थ त्यांना रुचतात. सकाळी खजूर, भिजवलेले बदाम, व्यायामानंतर थंडाई, नंतर सकस नाश्ता, दुपारी घरचं जेवण, सायंकाळी फळांचा रस किंवा फळं आणि रात्री हलकं जेवण असा त्यांच्या आहाराचा क्रम आहे. झोपेच्या वेळा अनिश्चित असल्या तरी सकाळची व्यायामाची वेळ मात्र त्यांनी ‘अनिवार्य’ केली आहे.

MLA Mahesh Landge
MLA Mahesh Landgesarkarnama

भवानी तालीम व एमडी फिटनेस

आमदार महेश लांडगे व त्यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी गावठाण येथे महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन अंतर्गत भवानी तालीम व एमडी फिटनेस व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. पारंपारिक माती कुस्ती आखाडा व गादी (मॅट) कुस्ती दोन्ही प्रकारात या ठिकाणी शिकविले जाते. जिम मध्ये आधुनिक पद्धतीचे व्यायाम साहित्य आहे तर तालमीत पारंपारिक कुस्तीचे साहित्य आहे. या तालमीत भोसरी गावठाण परिसरातील ५० पहिलवान प्रशिक्षण घेतात. यातील २५ पहिलवान निवासी शिक्षण घेतात. आमदार लांडगे स्वतः या व्यायामशाळेत नियमित व्यायाम करतात. नवरात्रीत ते तालमीत नऊ दिवस निवासी असतात.

आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल

कुस्ती प्रती असलेल्या प्रेमातून आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून भोसरी गाव जत्रा मैदान येथे पहिलवान मारुतरावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे. या अंतर्गत महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव कुस्ती ॲकॅडमी उभारण्यात आली आहे. या कुस्ती संकुलात माती सह चार गादी विभाग आहेत. पंचक्रोशीतील सुमारे १४० पहिलवान येथे प्रशिक्षण घेतात. यामध्ये ४० पहिलवान निवासी आहेत. वस्ताद व मुंबई महापौर केसरी अजय लांडगे आणि युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, कोच प्रशांत बाबर, कालिदास लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य येथे पहिलवान घडविले जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून कुस्ती संकुल आधुनिक पद्धतीने बनविले आहे. येथे जिम, स्टीम बाथसह वातानुकूलित सुविधा आहे. १५० ते २०० पहिलवान राहतील असे वसतिगृह व स्वतंत्र स्वयंपाकगृह व्यवस्था आहे.

(शब्दांकन : जयंत जाधव)

4 FAQs with One-Line Answers:

  1. प्रश्न: महेश लांडगे यांचा फिटनेस दिनक्रम कसा आहे?
    उत्तर: ते दररोज सकाळी ५.३० वाजता उठून व्यायाम आणि जिमसह आठवड्यातील सातही दिवस सराव करतात.

  2. प्रश्न: महेश लांडगे यांनी कोणती कुस्ती प्रशिक्षण संस्था स्थापन केली आहे?
    उत्तर: त्यांनी भवानी तालीमएमडी फिटनेस आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल स्थापन केली आहेत.

  3. प्रश्न: लांडगे यांच्या आहारशैलीची वैशिष्ट्ये कोणती?
    उत्तर: ते शिस्तबद्ध संतुलित आहार घेतात ज्यात खजूर, बदाम, थंडाई, घरचे जेवण व फळांचा समावेश असतो.

  4. प्रश्न: महेश लांडगे यांचे कुस्तीप्रेम राजकारणात कसे उपयोगी ठरले?
    उत्तर: कुस्ती स्पर्धांमुळे त्यांना सामाजिक व राजकीय जीवनात लोकप्रियता व नवी दिशा मिळाली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com