फडणवीसांची जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटलांसाठी मोर्चेबांधणी !

nishikant-patil--cm--Jayant Patil
nishikant-patil--cm--Jayant Patil
Published on
Updated on

इस्लामपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काही तासाच्या वाळवा तालुक्‍याच्या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी खलबते करतानाच कामाला लागा, असा  संदेश नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना दिला. 

पाटील यांच्या प्रकाश शिक्षण संस्थेच्या संकुलात वाळव्याआधीचा मुख्यमंत्र्यांचा तळ होता. इथेच त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातून भाजप नेते उपस्थित होते. पाटील यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार संभाजी पवार, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी यांच्याशीही चर्चा केली.

भाजपची पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय फडात जोमाने वाटचाल व्हावी यासाठी पक्षांतरांचा झपाटा लावणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठीही विविध राजकीय पक्षांतील सोंगट्या इस्लामपूरच्या पटावर एकत्र आणल्या होत्या. 

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या प्रकाश शिक्षण संकुलात जाहीर तर काही कमराबंद खलबते झाली. जिल्ह्यातील प्रमुख भाजप कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांची भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांच्या कुटुंबीयांनी वीस मिनिटे भेट घेतली.

 अर्थातच याला पार्श्‍वभूमी सर्वोदय सहकारी साखर कारखान्याची असली तर चर्चा मात्र कौटुंबिक स्वरूपाचीच झाली होती. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व संभाजी पवार यांचे भाजपमध्ये एक पर्व होते. त्या काळात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पवार यांचे नावही चर्चेत आले होते.

 मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यानी त्यावेळी फडणवीस यांचे नाव पुढे केले होते. युवा मोर्चाच्या विविध कार्यक्रमांसाठी फडणवीस मारुती चौकात आप्पांच्या कार्यालयात यायचे. फडणवीस यांनीही "काही काम असेल तर हक्काने सांगा', असे सांगत पवार यांना दिलासा दिला. यावेळी पवार कुटुंबीयांपैकी श्री. पवार यांच्या पत्नी अंजली, मुले पृथ्वीराज आणि गौतम उपस्थित होते. 
  
इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधायचे प्रयत्न यापूर्वीही झाले तरी त्याला सत्तेचे टॉनिक नव्हते. आता वेळ, काळ आणि दिशा बदलली आहे. इस्लामपूर नगरपालिकेतील जयंतरावांच्या तीन दशकांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला.

 जयंतरावांचेच एक बिनीचे शिलेदार निशिकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी तो लावला. त्यावेळी शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पवार यांच्यासह शहरातील अनेक छोट्या मोठया कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात खासदार राजू शेट्टी, नानासाहेब महाडिक यांनी पुढाकार घेतला होता. 

त्यानंतर इस्लामपूरच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शेतकरी संघटनेतील फुटीपासून नानासाहेब महाडिकांच्या सवत्या सुभ्यापर्यंतचे बदल झाले तरी जयंतरावांचा विरोधी उमेदवार कोण हा प्रश्‍न उरतोच. जयंत पाटील यांचीही भाजपशी असलेले जिल्ह्यातील सख्य आता संपुष्टात आले आहे. कधीकाळी भाजपची इथली ओळखच मुळी जयंत जनता पार्टी ऊर्फ जेजेपी असायची. मात्र जयंत पाटील यांनी आपली भाजप विरोधाची धार अलीकडे वाढवली आहे. 

त्यामुळेच इथे भाजपला आपला खरोखर लढणारा उमेदवार शोधावाच लागेल. अर्थातच सध्या भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे निशिकांत पाटील हेच प्रथम प्राधान्याचे नाव असेल. त्याचे शिक्कामोर्तबच आज झाले. कामाला लागा, असा थेट संदेशच त्यांनी पाटील यांना दिला.

वाळव्यासाठीच्या घोषणा
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी जयंतरावांच्या विरोधात लढत दिली आहे. मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते त्यांना मिळाली. मात्र त्यांचा मतदारसंघातील पासंग निर्णायक आहे. हुतात्मा गटाची म्हणून त्यांची प्रभावशाली गावे आहेत. खास हुतात्मा संकुलाच्या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जणू जयंतविरोधकांसोबत साखर पेरणी करीत दिशा स्पष्ट केली. 

नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी आणखी सोळा कोटी निधी, आष्ट्यासाठी स्वतंत्र तालुका अशा दोन महत्त्वपूर्ण घोषणा करतानाच जयंतरावांमुळेच हुतात्माचा डिस्टलरी प्रकल्प रेंगाळल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com