
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर 70 तासांच्या शोधानंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुणाट गावातील ऊसाच्या फडातून त्याला मध्यरात्री दीड वाजता ताब्यात घेण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी गुणाट गावातील नागरिकांचेही मदतीबाबत आभार मानले.
अमितेश कुमार म्हणाले, सुरूवातीच्या दीड ते दोन तासांतच स्वारगेट बसस्थानकातील 23 सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक गोष्टींचा आधार घेत आरोपीची ओळख पटवली होती. त्यानंतर तपासासाठी 13 पथक रवाना करण्यात आली होती. त्यादिवशी सुमारे दोनच्या सुमारास पोलीस गुणाट गावात पोहोचले होते. पण तिथे मिळाला नाही. मध्यरात्री तो हाती लागला.
सुरुवातीला आमचा गुप्त पद्धतीने तपास सुरू होता. पण जेव्हा पोलीस शोध घेत आहेत, हे आरोपीला कळले तेव्हा आम्ही उघडपणे तपास सुरू केला. उंच ऊसामुळे लांबचे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे ड्रोन कॅमेरा, श्वास पथक यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. रात्री तो पाणी पिण्यासाठी एका नातेवाईकाकडे आला, तेव्हा आम्हाला माहिती मिळाली.
संपूर्ण गावाभोवती आम्ही बंदोबस्त लावला होता. तिथले बस स्थानक, बस थांबे, सार्वजनिक वाहनांची येणे जाणे असते तिथे बंदोबस्त लावला होता. त्याच्यामुळे आरोपी पळून जाणे शक्य नव्हते. त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने मोटार सायकलवर पाठलाग करून आणि ड्रोनच्या मदतीने दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या.
या तपासात आरोपीचा भाऊ, गुणाट गावातील आणि आजूबाजूच्या गावातील 500 नागरिकांची, पोलीस पाटलांची, सरपंच या सगळ्यांची खूप मदत झाली. गावातील लोक मोटार सायकलवरून फिरत होते आणि कुठे जरी दिसला तरी लगेच माहिती देत होते. त्यामुळे मी स्वतः गुणाटला जाऊन गावकऱ्यांचा सत्कार करणार आहे, त्यांचे आभार मानणार आहे, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.
दत्ता गाडेला अटक करण्यासाठी मोठी पोलीस यंत्रणा राबविण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. स्वारगेट पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, गुन्हे शाखेचे अधिकारी, परिमंडळ दोनची टीम, ग्रामीण पोलीसांची स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्यांनी मिळून हे ऑपरेशन पूर्ण केल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
काही काही अधिकारी हे गुणाट गावात तळ ठोकून बसले होते. तीन दिवसात तिथून हलले देखील नाहीत. दिवस आणि रात्र ते झोपले नाहीत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोनचे उपायुक्त आरोपीच्या शोधमोहिमेवर लक्ष ठेवून होते. यामुळे कोणीही एकाने नाही तर पुणे पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. पोलिसांमध्ये कुठेही श्रेयवाद नाही, असेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.