Maharashtra BJP Politics : मोदी, शाहांच्या धक्कातंत्राला पुरून उरले, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले !

Devendra Fadnavis CM Journey : गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे भाजप, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीतील अपयश आणि पक्षांतर्गात राजकारणावर मात करत सरत्या वर्षांच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले आहेत. मी पुन्हा येईन, ही घोषणा त्यांनी खरी करून दाखवली आहे.
Devendra Fadnavis | Amit Shah|  Narendra Modi
Devendra Fadnavis | Amit Shah| Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: पक्षावर, सरकारवर आपली पकड राहावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जातो. गेल्यावर्षी राजस्थान, मध्यप्रदेशात याचा अनुभव आला आहे. हरियाणातही धक्कातंत्राचा वापर करत निवडणुकीच्या काही महिने अगोदर मुख्यमंत्री बदलण्यात आले होते. महाराष्ट्रात मात्र मोदी, शाह यांचे काहीएक चालले नाही. त्यांच्या धक्कातंत्राला देवेंद्र फडणवीस पुरून उरले आणि ते पुन्हा आले.

राज्यात गेल्या पाच वर्षांत ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याचे खापर अपेक्षेप्रमाणे भाजपवर फुटले आणि त्याचा सर्वाधिक फटका फडणवीस यांना बसला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून भाजपने सोबत घेतले. महाविकास आघाडीचे सरकार पडले, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले.

शिवसेनेचे फुटलेले आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले. शिवसेनेच्या फुटीमागे भाजपचा हात आहे, फार दिवस लपून राहिले नाही. गुवाहाटीत गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीच सांगितले, की महाशक्ती आपल्या पाठिशी आहे. ही महाशक्ती म्हणजे भाजप.

महायुतीचे सरकार तर आले, मात्र एक अपराधी भावना मनात घेऊनच. शिवसेना फोडल्याचे खापर भाजपवर फुटले होते. फडणवीस हे मास्टरमाइंड आहेत, असा संदेश गेला होता. लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. इतके सारे होऊनही फडणवीस यांना नाईलाजाने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले होते.

त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली होती. एखादा नेता उपमुख्यमंत्री झाला की तो नंतर कधीच मुख्यमंत्री होत नाही, असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास होता. त्यामुळे फडणवीस यांचे राजकीय भवितव्य अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले होते. फडणवीस यांनी अखेर तो इतिहास बदलला.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तर फडणवीस संपले, अशी चर्चा सुरू झाली होती. दिल्लीश्वरांनी महाराष्ट्रात नव्या चेहऱ्याचा शोधही सुरू केला होता. फडणवीस यांची पक्षांतर्गतही कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. 2019 मध्ये युती तुटली आणि सर्वाधिक आमदार असूनही सुरुवातीची अडीच वर्षे भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले होते.

मी पुन्हा येईन, अशी घोषणा त्यावेळी फडणवीस यांनी केली होती. समाजमाध्यमांवर या घोषणेची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली होती. अडीच वर्षांनंतर फडणवीस पुन्हा आले, मात्र उपमुख्यमंत्री बनून. त्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

हे देखिल वाचा -

Devendra Fadnavis | Amit Shah|  Narendra Modi
BJP Politics Video : एकनाथ शिंदेंची अडचण भाजप वाढवणार? 'या' पदावर करणार दावा

गेल्या वर्षी राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत विधानसभा निवडणूक झाली. भाजपने त्या राज्यांत धक्कातंत्र वापरले. मध्यप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना डावलण्यात आले आणि मुख्यमंत्रिपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली. राजस्थानातही वसुंधरराजे शिंदे यांना बाजूला सारण्यात आले. महाराष्ट्रातही असेच होणार, अशी चर्चा सुरू झाली. फडणवीस यांना डिवचण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही तसा प्रचार सुरू केला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता.

मराठा आरक्षण आंदेलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहेत, मात्र फडणवीस आडकाठी आणत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी जाहीरपणे केला होता. त्यामुळे फडणवीस यांची कोंडी झाली. मराठा समाजात त्यांच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला आरक्षण मिळाले नाही, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे.

मराठा समाजात अशी भावना निर्माण झालेली असताना फडणवीस यांनी ओबीसी समाजाला जवळ केले. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, असे विधान त्यांनी केले. त्यांचे काही सहकारी एका विशिष्ट समाजाविषयी सातत्याने मर्यादा सोडून बोलत राहिले, ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत राहिले. काही सहकारी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर पातळी सोडून टीका करत राहिले. हे चूक होते का, तर नक्कीच चूक होते, मात्र त्याचा निवडणुकीत फडणवीस आणि भाजपला फायदा झाला, हे निकालानंतर स्पष्ट झाले. राजकारणात सर्वकाही माफ असते, याची प्रचीती पुन्हा एकदा आली.

गेल्या पाच वर्षांत अनेकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. बड्या नेत्यांना कारागृहाची वारी करावी लागली. जे भाजपसोबत किंवा महायुतीसोबत आले, त्यांची मात्र सुटका झाली. भाजपचे नेते किरीट सोमय्या आरोप करायचे आणि मग संबंधितांच्या मागे तपासयंत्रणांचा ससेमिरा सुरू व्हायचा, हे उघड दिसत होते. तरीही भाजपचे नेते बधले नाहीत.

याचे खापरही फडणवीस यांच्या डोक्यावर फुटले. त्याला कारण ठरले किरीट सोमय्या यांचे एक विधान. फडणवीस आणि मी बसून यादी तयार करतो, त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला की मी आरोप करतो, असे सोमय्या यांनी एका मुलाखतीत सांगून टाकले, ते अनवधानाने बोलले की फडणवीस यांची अडचण करण्यासाठी बोलले, हा प्रश्न कायम आहे.

हे देखिल वाचा-

Devendra Fadnavis | Amit Shah|  Narendra Modi
National Politics in 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्याला मर्यादा; विरोधकांना संजीवनी, राहुल गांधींचा उदय

लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला सारून फडणवीस कामाला लागले होते. लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. महायुतीचा प्रचार धडाक्यात सुरू झाला होता. लोकसभेला महायुतीने उमेदवारांचा, मतदारसंघांचा घोळ घातला होता. विधानसभेला तसे झाले नाही. याच दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली. त्यासाठी फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांच्याएेवजी कोणाला मुख्यमंत्रिपद मिळणार, त्या नावांचीही चर्चा सुरू झाली. त्यामुळेच प्रचंड असे बहुमच मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण, हे निश्चित करण्यासाठी 10 ते 12 दिवस लागले.

फडणवीस यांच्या हातात राज्याची सूत्रे देण्यास दिल्लीश्वर इच्छुक नव्हते, हे उघड आहे. मात्र भाजपमध्ये फडणवीस यांच्या तोडीचा दुसरा कुणी नेता आहे का, असा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. त्यांना दिल्लीचा पाठिंबा होता, अशी चर्चा होती. त्यामुळे फडणवीस यांची पुरती कोंडी झाली होती. निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी त्यांची देहबोलीही बदलल्यासारखी दिसत होती. त्यामुळे भाजप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडताना धक्कातंत्र वापरणार, अशा चर्चेने जोर धरला होता.

दिल्लीश्वरांना धक्कातंत्र वापरायचे होते, मात्र भाजपच्या सर्व आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला. अजितदादा पवार हेही त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे दिल्लीश्वरांची आणि एकनाथ शिंदे यांचीही कोंडी झाली.

फडणवीस आणि अजितदादा पवार यांची केमिस्ट्री जुळलेली आहे, हे या घडामोडीवरून सिद्ध झाले. नेता निवडीसाठी दिल्लीहून निरीक्षक आले. भाजपचे सर्व आमदार फडणवीस यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव जाहीर झाले. अशा पद्धतीने फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले.

महायुतीचे संख्याबळ पाहता या सरकारला पाच वर्षे कोणताही धोका होण्याची शक्यता नाही, हे ओळखून फडणवीस यांनी भाजपच्या काही दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला. त्यात सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आदींचा समावेश आहे.

फडणवीस यांनी एका अर्थाने हा धोका पत्करला आहे. पुढची पाच वर्षे विनासायास जाणार, असे वाटत असतानाच बीड जिल्ह्यात सरंपचाची हत्या आणि परभणीत पोलिस कोठडीतील मृत्यूमुळे फडणवीस यांच्यासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. या आणि पक्षांतर्गत आव्हानांना ते कसे सामोरे जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com