National Politics in 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्याला मर्यादा; विरोधकांना संजीवनी, राहुल गांधींचा उदय

Political Happenings in year 2024 at National Level : सरत्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दबदबा कमी झाला तो लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घटलेल्या जागांमुळे. पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा मर्यादित झाला. गेली दहा वर्षे विरोधी पक्षनेत्याविना असलेल्या लोकसभेला सरत्या वर्षाने राहुल गांधी यांच्यासारखा विरोधी पक्षनेते दिला. इंडिया आघाडीच्या जागा वाढल्यामुळे विरोधकांना संजीवनी मिळाली.
Narendra Modi | Rahul Gandi
Narendra Modi | Rahul Gandi Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi: देशात 2014 पासून मोदीपर्व सुरू झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि देशभरात भाजपची भरभराट झाली. विरोधकांच्या ताब्यातून भाजपने अनेक राज्ये हिसकावून घेतली, हिंदी पट्ट्यातील अनेक राज्ये आपल्या ताब्यात कायम ठेवली. भाजप सर्वशक्तिमान, तर विरोधक नेस्तनाबूत झाल्याचे चित्र दिसत होते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपला धक्का बसला. सरत्या वर्षात, म्हणजे 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची एनडीएमध्ये आणि पक्षांतर्गत शक्तीही कमी झाली. भाजपला या निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळू शकले नाही.

नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, त्यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. या यशाची 2019 मध्येही पुनरावृत्ती झाली होती. 2014 ते 2024 पर्यंत लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा एकाही पक्षाला मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे मोदी, शाह यांना कोणतीही आडकाठी नव्हती.

विरोधकांचा आवाज क्षीण झाला होता. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पाय घट्ट रोवून उभ्या होत्या, बिहारमध्ये नितीशकुमारांना भाजपने सोबत घेतले. इकडे महाराष्ट्रातही भाजपची डोकेदुखी वाढली होती.

हे देखिल वाचा-

Narendra Modi | Rahul Gandi
Atishi Marlena : 24 तासांचा अल्टिमेटम, नाहीतर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढू

लोकसभेला महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट

महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली, महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन झाले. शिवसेना-भाजपची युती तुटली होती. अडीच वर्षांनंतर शिवसेनेत फूट पाडून भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. याद्वारे भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील आपले भवितव्य स्वतःच्या हाताने लिहिले होते.

आपण भलतेच काहीतरी करून ठेवले, हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपच्या लक्षात आले. महाराष्ट्रात भाजपची मोठी पीछेहाट झाली. महायुतीला 48 पैकी केवळ 17 जागा मिळाल्या. त्यात भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात ठाण मांडले होते. मोदी यांनी जितक्या सभा घेतल्या तितकेही त्यांचे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत. मोदींच्या सभांसाठी गर्दी जमवावी लागली. मोदींनी सभा घेतलेल्या बहुतांश ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले होते.

2014 नंतर जवळपास 11 वर्षांनी 2024 मध्ये असे पहिल्यांदाच झाले होते. मोदी यांची सभा मिळवण्यासाठी उमेदवारांना जिवाचे रान करावे लागत असे. मोदींची सभा झाली की आपला विजय निश्चित, असे उमेदवारांना वाटत असे. ते खरेही होते, मात्र 2024 मध्ये हे चित्र बदलले. मोदींचा करिश्मा मर्यादित झाल्याची चर्चा सुरू झाली.

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या दोन-तीन टप्प्यांपर्यंत सर्व सुरळीत होते. भाजपकडून विकासकामांवर चर्चा केली जात होती. नंतर मात्र चित्र बदलले. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभांमधून थेट ध्रुवीकरणाची भाषा सुरू केली. याला कारण ठरले होते संविधान! राज्यघटना बदलायची असेल तर भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्यात, अशी विधाने भाजपच्या बड्या नेत्यांनी केली होती.

हे देखिल वाचा-

Narendra Modi | Rahul Gandi
Bihar Assembly Election : अखेर भाजपच्या मनातलं बाहेर आलंच; नितीश कुमारांची फजिती होणार?

राज्यघटनेच्या नॅरेटिव्हने रोखली भाजपची पिछेहाट

या निवडणुकीत भाजपने 'अब की बार चारसौ पार' अशी घोषणा दिली होती. राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा हव्यात, असा प्रचार इंडिया अघाडीने सुरू केला होता. भाजपला राज्यघटना बदलायची आहे, असा प्रचार करण्याची संधी इंडिया आघाडीला भाजपनेच दिली होती. 2024 ची पहिलीच अशी निवडणूक होती ज्यात भाजपला विरोधकांच्या खेळपट्टीवर येऊन खेळावे लागले होते.

त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि भाजपची घौडदोड थांबली, स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या, बहुमतासाठी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा टेकू भाजपला घ्यावा लागला. विरोधक मजबूत झाले. काँग्रेसने शंभरी गाठली. त्यामुळे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले. राहुल गांधींनी लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन शक्तिशाली प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले होते. त्याचा फटका भाजपला बसला. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष कमकुमत करण्यात आले होते. यामुळे आपले 'मिशन 45' यशस्वी होईल, असे भाजपला वाटत होते. मात्र भाजपचा हा अंदाज सपशेल खोटा ठरला. महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. सांगलीतून विजयी झालेले अपक्ष विशाल पाटील हे काँग्रेसकडे परत आले. भाजप आणि महायुतीला मतदारांनी तोंडघशी पाडले होते. 2019 मध्ये युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या.

भाजपने 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये भाजपला 64 जागांचा फटका बसला. यासाठी जसा महाराष्ट्रासह हिंदी पट्टाही कारणीभूत ठरला. भाजपने हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये तब्बल 55 जागा गमावल्या. उत्तरप्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याने 2024 च्या निवडणुकीत भाजपची घोर निराशा केली.

राममंदिराचा मुद्दा पण फेल...

2019 मध्ये उत्तरप्रदेशातील 80 पैकी 62 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत एनडीएला केवळ 36 जागा मिळाल्या. हा मोदीं आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या निवडणुकीने पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दबदबा कमी केला.

सरत्या वर्षांतच अयोध्येत राममंदिराची उभारणी पूर्ण झाली होती. राममंदिर आंदोलन आणि त्यानंतर राममंदिराची उभारणी या मुद्द्यावरच भाजपने देशभरात बस्तान बसवले आहे. राममंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी थाटामाटात करण्यात आला. काम अपूर्ण असतानाही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा सोहळा केल्याचे आरोप विरोधकांनी केले. काही शंकराचार्यांनीही या सोहळ्यावर आक्षेप घेतला होता.

राममंदिर हा मुद्दा राजकीय नव्हे, तर धार्मिक आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. मात्र राममंदिराचा मुद्दा उत्तरप्रदेशातही चालला नाही. अयोध्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येते, तेथेही भाजप उमेदवाराचा पराभाव झाला. भाजपने रामायण मालिकेत श्रीरामांची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल यांना मेरठमधून उमेदवारी दिली होती, त्यांचाही पराभव झाला.

राहुल गांधी यांना घेरण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. राहुल गांधी यांनी एखाद्या विषयावर मत मांडले की त्याचा प्रतिवाद करण्यासाठी, त्यांना खोटे ठरवण्यासाठी भाजपची टीम रिंगणात उतरते. यासाठी भाजपकडून मित्रपक्षांच्याही नेत्यांचा वापर केला जातो. भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रेमुळे राहुल गांधी यांना लोक गांभीर्याने घेऊ लागले.

लोकांनी त्यांना गांभीर्याने घेऊ नये, यासाठी भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना यावेळी यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या, सांगलीच्या विशाल पाटलांमुळे हा आकडा 100 वर पोहोचला. इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या.

राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनले. 234 जागा मिळाल्यामुळे विरोधक मजबूत झाले, त्यांचा आवाज वाढला. मोदी, शाह यांना विरोधकांची दखल घ्यावी लागली. राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहारला झुकते माप देण्यात आले.

याद्वारे मोदी आणि शाह हे पहिल्यांदाच बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदच असे चित्र दिसले. त्यानंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत अनेक राज्यांत भाजपला यश मिळाले, मात्र त्यामुळे त्या त्या राज्यांतील नेत्यांचा दबदबा वाढल्याचे दिसून आले. नवीन वर्षात चित्र कसे राहिल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com