

Aimim News : महापालिका निवडणुकीत एमआयएमने राज्यभरातील महापालिकांमध्ये चांगले यश मिळवले. या पक्षाचे 125 नगरसेवक विविध ठिकाणी निवडून आले आहेत. एकट्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 33 नगरसेवकांनी विजय मिळवत पक्षाला दोन नंबरवर आणले. राज्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमने निवडणुका लढवल्या. पक्षाचे सर्वेसर्वा असदु्द्दीन ओवैसी, अकबरोद्दीन ओवैसी यांनी प्रचार सभा, पदयात्रा काढत मुस्लिम बहुल भाग पिंजून काढले. परिणामी एमआयएमच्या पतंगाने उंच भरारी घेत सर्वांनाच धक्का दिला.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये एमआयएमचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आले होते. परंतु स्थानिक पातळीवर पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवत विदर्भातील अकोट आणि बीड जिल्ह्यातील परळीमध्ये तेथील नगरसेवकांनी स्थानिक आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या शिवसेना-भाजप या पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम लढते, त्याच पक्षांसोबत आघाडी केल्याने पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. हा अनुभव लक्षात घेता महापालिका निवडणुकीतील यशानंतर एमआयएम पक्ष अलर्ट झाला आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देताना त्यांना फर्मानही सोडले.
अकोट आणि परळीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजपचा सहभाग असेल्या आघाडीत एमआयएम गेल्याने पक्षाला टीकेला समोर जावे लागले होते. पक्षाला विश्वासात न घेता अकोटमध्ये स्थानिक विकास आघाडीत सहभागी होणाऱ्या पाचही नगसेवकांवर एमआयएमने पाच वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. परळीत पक्षाच्या आदेशानंतर संबंधित नगरसेवकांना या स्थानिक आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते.
या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी महापालिकेत निवडून आलेल्या राज्यातील सगळ्या नवनिर्वाचित नगरसेकांना एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतः इम्तियाज जलील यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय परस्पर घेऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद असो की मग स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया असो, यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो पक्ष पातळीवर असदुद्दीन ओवेसी हेच घेतली.
नगरसेवकांनी आपला प्रस्ताव किंवा भूमिका ही प्रथम आपल्या स्थानिक नेते आणि त्यांच्या मार्फत आमच्याकडे पाठवावेत. त्यावर संबंधित नगरसेवक, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आणि अंतिम चर्चा ओवेसी यांच्याशी करून ते सांगतील तोच निर्णय सर्वांसाठी अंतिम राहील, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. पक्षाचा आदेश डावलून कोणी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, अशावेळी संबंधितावर पक्ष कठोर कारवाई करेल, असा इशाराही इम्तियाज यांनी दिला.
नगरपालिका, नगरपंचयात आणि आता महापालिका निवडणुकीत एमआयएमला मोठे यश मिळाले आहे. मतदारांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाणार नाही, असे काम पुढच्या काळात आपल्याला करायचे आहे. यावर असदुद्दीन ओवेसी यांचे सविस्तर मार्गदर्शन घेण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लवकरच नगरपालिकेतील शंभर आणि महापालिकेत निवडून आलेल्या 125 अशा सगळ्या नगरसेवकांना घेऊन हैदराबादला जाणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. दोनशे अडीचशे गाड्यांवर एमआयएमचा झेंडा लावून आपण हैदराबादला जाऊ, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.