
Beed News : ट्रकवर चालक असलेल्या तरुणाचे आपल्या मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या कारणावरुन एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. वायर, दोरीने त्याची पाठ अक्षरशः सोलून निघाली आणि यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे आधीच धिंदवडे निघालेले असताना जिल्ह्यात रोज मारहाण, खूनाचे प्रकार समोर येत आहेत.
यावर अंकुश बसावा यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःकडे ठेवले. मात्र एक बैठक सोडली तर ते पुन्हा बीडकडे फिरकले नाहीत. विकास बनसोडेच्या मृत्यूनंतर पून्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'अजित पवार पालकमंत्री झाल्याचा परिणाम अजून तरी बीडवर झालेला दिसत नाही, असा टोला लगावला आहे.
विकास बनसोडे याला झालेली अमानूष मारहाण, त्याच्या पाठीवर उमटलेले वळ, याचा दाखला देत 'हे फटके विकास बनसोडेच्या पाठीसह बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही मारलेले आहेत. तब्बल दोन दिवस एखाद्याला बांधून ठेवले जाते आणि मरेपर्यंत मारले जाते याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही, जे गंभीर आहे! अजित पवार पालकमंत्री झाल्याचा काही परिणाम अजून तरी बीडवर झालेला दिसत नाही, अशा शब्दात (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पिंपरी गावात क्रौर्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. विकास बनसोडे नावाच्या ट्रकचालकाचे आपल्याच मालकाच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याचे समजताच या मालकाने इतरांच्या सोबतीने विकास बनसोडे याला दोन दिवस बांधून ठेवले. त्याला दोरी आणि वायरने अमानुष मारहाण केली, त्याची पाठ अक्षरश: सोलून काढली. या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच विकास बनसोडे यालाही अमानुष मारहाण करत मारून टाकण्यात आल्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला.
23 वर्षाच्या या तरुणाची ही हत्या बीड मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचा संताप सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटना राज्याला शोभणाऱ्या नाहीत. आरोपींवर कारवाई होत नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडले जातात, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर यातील आरोपींना अटक झाली असली तरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही.
उलट एकमेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत कुरघोडी करण्याचा आणि आपली दहशत कायम राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकास बनसोडे याच्या हत्येनंतर दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सात संशयित आरोपी फरार आहेत. संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचे राजकीय हितसंबंध लक्षात घेता तपासावर कुठलाही परिणाम होऊ नये, राजकीय दबाव वाढू नये, या हेतूने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे घेतले.
त्यानंतर त्यांनी बीडमध्ये येऊन एक बैठकही घेतली. त्यानंतर मात्र ते पुन्हा बीडमध्ये फिरकले नाहीत. अजित पवार हे शिस्त आणि सडेतोड भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. बीड जिल्ह्याचे पालकत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा सगळ्यांकडूनच व्यक्त केली जात होती. मात्र दररोज घडणाऱ्या घटना पाहता अजित पवार यांच्या पालकमंत्री पदाचा परिणाम अजून तरी बीड जिल्ह्यावर झालेला दिसत नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.