
Suraj Chavan Controversy : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट आज (शुक्रवार) पुण्यात भेट घेतली. यावेळी सुरज चव्हाण यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचे कलमही वाढविण्याचे आदेश अजित पवार यांनी लातुरच्या पोलीस अधिक्षकांना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातुर दौऱ्यातील पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विजय घाडगे यांनी पत्ते भिरकावले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या सुरज चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी घाडगे व त्यांच्यासोबत आलेल्या तीन ते चार जणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा नोंद आहे.
यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. परंतु किरकोळ मारहाणीची कलमं लावल्याने लगेच त्यांची जामीनावर सुटकाही झाली. पोलीसांच्या या कारवाईवरून छावा संघटनेसह विरोधकांनी संताप व्यक्त करत राजकीय दबावामुळे किरकोळ कलमं लावून चव्हाण व इतर कार्यकर्त्यांचा बचाव केल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे कलम वाढविण्याची मागणी सुरु होती.
त्यानंतर आज घाडगे यांनी रुग्णवाहिकेतून येऊन अजित पवार यांची भेट घेतली. यात कोकाटे यांच्या राजीनामा घेण्यात यावा अशी पहिली मागणी घाडगे यांनी केली. त्यावर मंगळवारपर्यंत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अजितदादांनी दिले. त्यानंतर बैठकीतूनच लातूरच्या पोलीस अधिक्षकांना फोन लावला. यावेळी त्यांनी घाडगे यांना करण्यात आलेल्या मारहाणीबद्दल 307 चा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
विजय घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी यापूर्वी अजित पवार यांनी सुरच चव्हाण यांचा युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर त्यांच्या गुन्हे दाखल करण्याचे आदेशही अजित पवार यांनीच दिले होते. आता चव्हाण यांना तिसरा दणका देत त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी चव्हाण यांच्यावर कोणती कलम लावली आहेत?
सुरज चव्हाण यांच्यासह इतर आरोपींवर पोलीसांनी मारहाणीची किरकोळ कलमं लावल्याचा आरोप केला जात आहे. पोलीसांनी या सर्वांवर कलमं भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस) 2023 118(1),115(2),351(2), 351(3),189 (2),191(2), 190 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे 135 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.