
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव काकाटे यांचा विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलने होत आहेत. अशात कोकाटे यांनी दोन दिवसांनी घर सोडलं. गुरुवारी (दि. ४) माध्यमांना चकवा देत धुळ्यात दाखल झाले.
कोकाटे धुळ्यात मुक्कामी थांबलेल्या हॉटेल बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला. जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोकाटेंना त्यांनी काळे झेंडे व पत्ते दाखवत निषेध नोंदवला. त्यामुळे इकडे माध्यमांना चकवा देऊन धुळ्यात दाखल झालेल्या कोकाटेंना तिथे पोहचल्यावर ठाकरे व पवारांच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला.
कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन वेळा कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने कोकाटे यांच्यावर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवली आहे. कोकाटे यांच्या उपस्थितीत पक्षाचा शुक्रवारी मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी कोकाटे धुळ्याला गेले. मात्र कोकाटे ज्या हॉटेलला थांबले त्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी सुरु केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
कोकाटेंना पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला. यावेळी त्यांच्या हातात काळे झेंडेही होते. शेतकऱ्यांनो शेती सोडा, रमी खेळा ह.भ.प. माणिक कोकाटे, शेतकऱ्यांनो रमी खेळा, लाखो जिंका, ऑनलाईन रमी, अशा आशयाचे बॅनर्स झळकावत ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाटेंचा निषेध केला जात आहे. दरम्यान, टॉपलाईन हॉटेल बाहेर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान धुळ्याला जात असताना मंत्री कोकाटे यांनी चांदवडमध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. शिरीष कोतवाल यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कारण यावेळी कोकाटे यांचे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत त्यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसे वृत्तही प्रसारीत झाले. परंतु यासंदर्भात शिरीष कोतवाल यांनी स्पष्टीकरण दिलं असून कोकाटे यांचा सत्कार आम्ही केलेला नाही. त्यांनीच माझ्या वाढदिवसानिमित्त माझा सत्कार केला. याबाबत प्रसारित झालेले वृत्त चुकीचे असल्याचे कोतवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.