

Akola Congress leader murder : अकोला जिल्ह्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी घटना अकोट तालुक्यात घडली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काल दुपारी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात मशिदीबाहेर हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले; मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप उबेद पटेल उर्फ कालू पटेल या तरुणावर करण्यात आला आहे. या आरोपीला अकोट तालुक्यातील पणज गावातून पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या हल्ल्यामागे केवळ एक व्यक्ती नसून मोठे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पटेल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी उबेद पटेल याला चिथावणी दिली होती. या तक्रारीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेसचे नेते तसेच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची नावे थेट आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. याशिवाय फाजील आसिफ खान आणि फारुख आसिफ खान यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरुवातीला पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून राजकीय नेत्यांची नावे असल्याने तपास अधिक संवेदनशील झाला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे रक्तबंबाळ अवस्थेत घराकडे येत असताना दिसले. त्यांना काय झाले असे विचारले असता, त्यांनी मशिदीत बसलेले असताना उबेद पटेल याने पाठीमागून येत चाकूने गाल, पोट, छाती, पाठ आणि गुप्तांगाजवळ वार केल्याचे सांगितले. हा हल्ला जाणीवपूर्वक जीव घेण्याच्या उद्देशाने केल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
हल्ल्यानंतर हिदायत पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी जखमी अवस्थेत हल्ल्याच्या पार्श्वभूमीबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उबेद पटेल याने हल्ला करताना काही नेत्यांची नावे घेतली आणि “मला तुम्हाला मारायला सांगितले होते” असे म्हटले. तसेच, फाजील आणि फारुख यांनी त्याला संरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण घटनेमुळे अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राजकीय वादातून थेट हत्या झाल्याचा आरोप होत असल्याने राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दुसरीकडे, या प्रकरणात अडकवण्यात आलेल्या नेत्यांकडून आरोप फेटाळले जातील, अशीही शक्यता आहे.
सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते आणि किती जणांवर खुनाचा गुन्हा दाखल होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.