Amravati Political News : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरोधात उमेदवारी कायम ठेवणाऱ्या भाजपच्या तीन बंडखोरांवर पक्षाने कारवाई केली आहे. भाजपचे चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड यांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे, निष्कासित करण्यात आलेल्या संगीता शिंदे या भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. या कारवाईमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे.
निवडणुकीत बंडखोरी; भाजपची कारवाई
राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढती होत आहेत. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातही अशीच परिस्थिती निर्माण झाली. या मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपशी संबंधित चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
अनिल बोंडे यांच्या भगिनीचा समावेश
भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनीही अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यांच्यासोबत चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार यांनीही माघार न घेतल्याने पक्षाची अडचण वाढली.
बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या संदर्भात भूमिका मांडली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत काही इच्छुकांनी माघार घेतली; मात्र संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला.
सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासन
अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपने या तिघांवर शिस्तभंगाची कारवाई केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड यांनी चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले.
या कारवाईमुळे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अधिक चर्चेत आली आहे. बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेमुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या तिन्ही उमेदवारांच्या भूमिकेचा अधिकृत उमेदवाराच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.