Vardha News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दोनच दिवसांपूर्वी वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनबाई पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले होते.
हे प्रकरण ताजे असतानाच याच प्रकरणी या पत्रकार परिषदेतील एका गोष्टीवर राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या उपनेत्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhere) या अडचणीत आल्या आहेत. (Sushma Andhare News )
या प्रकरणात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पूजा तडस यांच्या 17 महिन्यांच्या मुलालाही पत्रकार परिषदेत आणण्यात आले होते. यावर राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने आक्षेप घेतले आहेत.
या प्रकरणी आयोगाच्या आयुक्तांनी अंधारे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच लहान मुलाला अशा पद्धतीने पत्रकार परिषदेत आणून लहान मुलाचा वापर प्रचारात केल्याबद्दल सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या आयुक्तांनी केली आहे.
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिले आहे, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली.
राजकीय स्वार्थासाठी सुषमा अंधारे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून, आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे. या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुशीबेन शहा यांनी पत्राद्वारे केली आहे.
R