
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात एकीकडे गंभीर आरोप केले जात असतानाच दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अडचणीत आणलं होतं.त्यांनी मुंडेवर कृषिमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.आता याचप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यावेळी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले, ते पुराव्यानिशी मी सगळं देणार'असल्याचंही म्हटलं होतं. आता अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं आहे.माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारासंबंधी राज्याच्या लाचलुचपत विभागाला पत्र लिहून तक्रार दिली होती.आता एसीबी विभागानं अंजली दमानिया यांना या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. या पत्रात लाचलुचपत विभागानं दमानिया या चौकशीला उपस्थित न राहिल्यास त्यांचे या प्रकरणात काहीही म्हणणं नाही, असे समजून हा अर्ज दप्तरी दाखल करण्यात येणार असल्याचं नमूद केलं आहे.
एकीकडे संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांवर आरोप करत धनंजय मुंडे यांना घायाळ केलं होतं. याचवेळी दुसरीकडे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यातील घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.
तसेच महाविकास आघाडी सरकार असताना 2022 मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून ही विशेष योजना सुरू करण्यात आली होती.याच योजनेतील नियमांचं उल्लंघन करत मुंडेंनी कृषिमंत्र्याच्या कार्यकाळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी करत खळबळ उडवून दिली होती.
तर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती,असं खुलासा केला होता.तसेच अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतायत ते पत्र नसून टिपण आहे असून टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.
कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही. दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्या फक्त मिडीया ट्रायलसाठी आरोप करत आहेत, असा आरोपही मुंडेंनी केला होता.
टेंडरची प्रक्रिया न करताच कच्चा माल विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले. जवळपास पावणे तीनशे कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 92 रुपयाला नॅनो युरियाची बाटली मिळते, ती 220 रुपयांना घेण्यात आली. दुपटीपेक्षा जास्त किमतीने ही बाटली घेतली. नॅनो युरिया, नॅनो डीओबी यात जवळपास 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. 557 रुपयांची बॅग 1200 रुपयांना घेतली.2400 रुपयांचा फवारणी पंप 3500 रुपयांना खरेदी केला, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.