Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर महायुतीकडून ताकही फुंकून पिले जात आहे. राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने आतापासूनच प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी राज्यातील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदाराची उमेदवारी न कापल्याने केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), रक्षा खडसे हे दोन विद्यमान खासदार विजयी झाले होते. त्यामुळे या नुकत्याच केलेल्या सर्व्हेमुळे विधानसभा निवडणुकीची तयारीत असलेल्या भाजप (Bjp) नेत्याची कोंडी झाली आहे. भाजपला अनेक मतदारसंघांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी कापावी लागणार असल्याची महत्त्वाची बाब या सर्वेक्षणातून समोर आली आहे. (Bjp News)
भाजपने 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजप 150 हून अधिक जागा लढवण्याच्या तयारी करीत आहे. अनेक आमदारांच्या जागी नवे चेहरे दिल्यास पक्षाला 80 ते 90 जागा मिळतील, असे सर्व्हेमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदाराना नारळ द्यावे लागणार आहे, त्यामुळे भाजपची डोकेदुखी येत्या काळात वाढणार आहे.
येत्या निवडणुकीत महायतीकडून तीन तर महाविकास आघाडीकडून तीन असे सहा पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे एकाद्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्यास ते या पक्षात जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या जागी तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला पाडण्यासाठी तो इतर पक्षाची मदत करू शकतो किंवा विरोधात उमेदवारी घेऊन ऐनवेळी रिंगणात उतरू शकतो. त्यामुळे भाजपच्या नेत्याचा कस लागणार आहे.
लोकसभेत काही जागांवर अटातटीची निवडणूक पार पडली. त्यामुळे कमी अधिक मताने महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे हाच ट्रेंड विधानसभा निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता असल्याने विद्यमान आमदारांची उमेदवारी कापण्यावरून द्विधा स्थिती झाली आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विधानसभेला भाजप अनेक आमदारांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्यांना संधी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नेमकी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती काय असणार हे समजण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.