

नाशिक कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये साधूग्राम उभारण्यासाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांच्या 'निवडक आंदोलनां'वर प्रश्न उपस्थित करणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
या विधानामुळे तपोवन वृक्षतोडीच्या वादाला नवी राजकीय दिशा मिळाली असून सोशल मीडियावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
Nitesh Rane News : नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू असून येथील तपोवनातील जागा साधू-महंतांना राहण्यासाठी तयार केली जाणार आहे. त्यासाठी येथील झाडांची कत्तल केली जाणार असून याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. यावरूनच सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी विरोधकरणाऱ्या राजकीय मंडळी, मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसह पर्यावरणप्रेमींना टोला लगावत सवाल केला आहे. त्यांनी तपोवन वृक्षतोडीसंदर्भात एक ट्वीट करत वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेळी बकरींच्या कत्तलीला विरोध का करत नाहीत, विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असे ट्वीट केलं आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नाशिक येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सध्या याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. तर येथे येणाऱ्या साधू-महंतांना राहण्याची सोय व्हावी यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. ज्यासाठी तपोवनातील 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेनं नोटीस देखील काढली आहे. ज्यानंतर परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोध दर्शवला आहे.
मात्र आता या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला असून नितेश राणे यांनी आपल्या सोशल मिडिया'एक्स'वर पोस्ट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी, तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बोलत नाहीत वा विरोध करताना दिसत नाहीत. ईदच्या वेळी बकरी कापण्याला ते विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा मात्र ते गप्प का? सर्व धर्म सम भाव? असे विधान त्यांनी केले आहे. एकीकडे तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा दिल्ली दरबारी संसदेतही तापलेला असतानाच दुसरीकडे नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
त्यांच्या या विधानानंतर शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाटांनी हिंदुत्वाचा आणि झाडांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे असे विधानं करू नये असे म्हणत नितेश राणेंना टोला लगावला आहे. तर झाडांची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी असून 'बकरे ऑक्सिजन देत नाहीत'... अशी मिश्किल टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलीय.
दरम्यान पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी रोखठोक भूमिका घेत ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल केला आहे. तर वृक्षतोडीवरून टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर त्यांनी बोलणं टाळलंय आहे. त्यांनी, मला अशा गोष्टींना उत्तर द्यायचं नाही, अशी प्रतिक्रिया देताना यात कोणीही राजकारण आणू नका असे आवाहन केले आहे. तर दहा वर्षे झालेली झाडं मोडायची आणि त्या बदल्यात दुसरी 10 झाडं लावणं ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं महत्वाची आहेत आणि ती जगली पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर, नितेश राणेंना कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपलं मंत्रिपद आणि आपलं राजकारण टिकण्यासाठीच ते अशी वक्तव्य करतात. त्यांना पुढच्या पिढीची काळजी नाही, फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा झाला नाही का? शेकडो वर्षापासून नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. तेव्हा झाड तोडण्याची गरज पडली नाही. मग आत्ताच का? असा सवाल करत त्यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
तर नितेश राणेंच्या या विधानानंतर नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त करताना बकरी आणि झाडांचा संबंध आहे का? असा सवाल केला आहे. तसेच यांच्या डोक्यात फक्त कोंबडी, बकऱ्याच भरल्या आहेत, अशी खोचक टीका करताना, नितेश राणे यांनी पर्यावरण आणि धर्म यांची सांगड घालू नये...अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.
FAQs :
1. तपोवनमध्ये नेमकी किती झाडे तोडली जाणार आहेत?
– साधूग्राम उभारण्यासाठी सुमारे 1800 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे.
2. स्थानिक लोक आणि पर्यावरणप्रेमी यांचा विरोध का आहे?
– मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली तर पर्यावरणीय समतोल बिघडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
3. नितेश राणे यांनी वादग्रस्त काय वक्तव्य केले?
– त्यांनी पर्यावरणवाद्यांवर 'ईदला बकऱ्या कापताना विरोध करत नाहीत' असा आरोप करत धार्मिक तुलना केली.
4. सेलिब्रिटीही या विरोधात आहेत का?
– होय, अनेक स्थानिक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
5. वृक्षतोड कोणत्या प्रकल्पासाठी केली जात आहे?
– 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी साधूग्राम उभारण्यासाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.