Pankaja Munde News : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील भोसरी परिसरातून नोडल सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अमोल काळे (वय - 25) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यापूर्वीच्या घडामोडी नाट्यमय आहेत.
नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांनी या प्रकाराची माहिती भाजपचे राज्यस्तरीय समाज माध्यम समन्वयक प्रकाश गाडे यांना दिली. त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयातील समाज माध्यम समन्वयक निखिल भामरे यांना सांगितले. तसेच त्यांना तक्रार देण्याबाबतही सूचना दिल्या. त्यानुसार, मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवून अज्ञात व्यक्ती त्रास देत असल्याचे तक्रार भामरे यांनी नोंदवली.
या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर लोकेशन्स डिटेल्स मागवण्यात आले. तो मोबाइल क्रमांक पुण्यात असल्याची माहिती नोडल सायबर पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने भोसरी परिसरातून अमोल काळे याला ताब्यात घेतले.
चौकशीत आपण मेसेज पाठवून त्रास दिल्याची कबुली काळेने दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर काळे हा बीड जिल्ह्यातील परळीचाच रहिवासी असून पुण्यात तो शिक्षण घेत असल्याचे समोर आले. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याने काही संदेश डिलिट केल्याचे उघडकीस आले आहे.
प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 78 आणि 79 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता त्याने मंत्री मुंडे यांना असा त्रास का दिला? यापूर्वीही अशा प्रकारे आणखी कोणाला त्रास दिला आहे का? याची चौकशी सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.