

Marathwada Politics : महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या 7 पैकी भाजपाच्या कोट्यातील 4 जागांचा सस्पेंस आज संपला. दिल्लीतील भाजप नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. इतर 2 नावे मात्र पक्षाच्या धक्कातंत्राला अनुसरूनच समोर आली. नागपूरमधून भाजपाच्या महापालिकेतील पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या आदिवासी समाजाच्या माया इवनाते आणि परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते, माजी आमदार रामराव वडकुते यांच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का बसला.
2020 मध्ये तेव्हा चर्चेत नसलेले डाॅ. भागवत कराड यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी देत धक्का दिला होता. पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच्या खेळीत वंजारी समाजाच्या कराड यांना पक्षाने थेट राज्यसभेवर पाठवले होते. दोन वर्षातच केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कराड यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. पण मुदत संपल्यानंतर दिल्लीतील नेत्यांनी सोशल इंजिनिअरिंग साधत रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. दुसर्यांदा संधी मिळेल या अपेक्षेत असलेल्या कराड यांच्यासाठी हा धक्का होता.
याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली पण ज्यावर दिल्लीत विचारही झाला नाही अशा रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे यांनाही हा धक्का समजला जातो. भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगिनी माजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्यसभेवर घेत दिल्लीतील नेते त्यांचे पुनर्वसन करतील अशी आशा बाळगून होत्या. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती.
परंतु 2020 मध्ये त्यांच्या नावाची राज्यसभेवर चर्चा असताना जसा धक्का दिल्लीतील नेत्यांनी पंकजा मुंडे यांना दिला होता, तसा तो यावेळी प्रीतम मुंडे यांनाही दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेवर मराठवाड्यातून याआधी नांदेडमधून डाॅ. अजित गोपछेडे, त्यानंतर अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला ही जागा मिळेल की नाही? अशी शंकाही उपस्थित केली गेली. परंतु भागवत कराड यांच्या रुपाने मराठवाड्याकडे असलेली जागा आता रामराव वडकुतेंच्या संधीमुळे कायम राहिली आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या विजया रहाटकर यांच्या नावांची केवळ चर्चाच झाली. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेवर आपल्याला संधी मिळणार नाही, याची स्पष्ट कल्पना होती, असे बोलले जाते. पैकी विजया रहाटकर यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा असणारे आयोगाचे अध्यक्ष पद असल्याने पुन्हा त्यांना राज्यसभेवर संधीची शक्यता तशी कमीच होती. रावसाहेब दानवे यांना आता मागच्या दाराने राज्यसभेवर घेण्याचे कुठलेही कारण नव्हते.
या उलट 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या आणि धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामराव वडकुते यांना राज्यसभेवर संधी देत भाजपाच्या दिल्ली व राज्यातील प्रमुख नेत्यांनी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. हिंगोलीत भाजपकडून रामराव वडकुते यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी गांधी चौकात एकत्र येत जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, शशिकांत वडकुते व जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.