

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापूरमधील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या शीतल फराकटे यांना अजित पवारांची साथ सोडली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शीतल फराकटे यांनी पक्षाची साथ सोडली. यानंतर शीतल फराकटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तुलना ही थेट एमआयएमशी केली आहे. ते म्हणाले, शिंदे गट हा मराठी माणसांमधील एमआयएम असून तो बेईमान आणि महाराष्ट्रद्रोही आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राशी गद्दारी केली, त्यांच्याशी कोणतेही राजकीय संबंध ठेवता कामा नयेत. अशा गद्दारांना साथ देणारे लोक देखील त्याच विशेषणांना पात्र ठरतात, अशी जहरी टीकाही राऊतांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेवर केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेत महापौरपदासाठी मोठी ताकद लावली जात आहे. या महापालिकेत महापौर कोणाचा होणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हणाले, कोण कोणाच्या संपर्कात आहे, याचं कोडं आत्ता सांगणं कठीण असलं तरी KDMC मध्ये महायुतीची सत्ता नक्की येईल, आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अनेक अशा महापालिका आहेत तिथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळी समीकरण समोर येताना दिसत आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशातच आता अकोल्यामध्ये भाजपने शिवसेना ठाकरे गटाला युतीची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे. कारण राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहेत, मात्र आता अकोल्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठ नाराजी नाट्य पाहायला मिळाल. भाजपच्या चार ते पाच महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना ऐन वेळेला उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी इतर पक्षात जाऊन उमेदवारी घेत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या विलास बाबर यांना पोखरणी गटातून उमेदवारी देण्यात आली नाही, त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते तिथून निवडणूक लढवत आहेत. प्रणित खजे यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून आपला अर्ज दाखल केला आहे.
रायगडमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते येत्या प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन होणार आहे. यापूर्वी आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच भडकले. त्यांनी मीडियाशी बोलताना आम्ही सत्तेसाठी गद्दारांशी कसलीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले. नॉट रिचेबल असलेल्या आपल्या नगरसेवकांनीही त्यांनी चांगले सुनावले. याबाबत राज ठाकरे यांच्याशी आपली चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. घराणेशाहीचा आरोप होत असल्याने पक्ष आदेशानुसार जिल्हा परिषदेची उमेदवारी मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अर्चना पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेर आणि केशेगाव या दोन्ही गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्चना पाटील यांनी मागील टर्मला धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे भाजपमध्ये दाखल झाले आहे. समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपची वाखरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करत आहेत. काळेंच्या प्रवेशामुळे पंढरपुरात भाजपला बळ मिळालं आहे. आमदार अभिजीत पाटील यांच्या हाती राष्ट्रवादीचे सूत्रे आल्याने काळे गट भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे. आठ पैकी तीन जिल्हा परिषद गटामध्ये काळे निर्णायक ताकद आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यानंतर वकिल असीम सरोदे यांनी याप्रकरणी, आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र या प्रकरणाला तब्बल साडेतीन वर्षे उलटून गेली असतानाही अजूनही केवळ तारीखच दिली जात आहे. पुढील सुनावणीसाठी 23 तारीख देण्यात आली आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला दिले जाऊ शकते किंवा ते गोठवले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच, आतापर्यंत या चिन्हावर निवडून आलेले खासदार, आमदार किंवा नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांतील नगरसेवकांवर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चांदीच्या भावात गेल्या 24 तासात 15 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून येथील खामगावच्या प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदी तीन लाख 35 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. पण खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत ग्राहक नसल्याने शुकशुकाट आहे.
पुण्याच्या इंदापुरातून भरणे कुटुंबातील दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी बोरी पंचायत समिती गणासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकासावर मतदार आपल्या पाठीशी उभा राहतील. निवडणुकीत विजय आमचाच असेल असा दावा श्रीराज भरणे यांनी यावेळी केला आहे.
राज्याचे माजी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच, तर पंचायत समितीच्या दहा जागेवर आपल्या समर्थकासह आज बुधवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा तालुका शिवसेनेला खिंडार पडले असून, आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचला आहे.
अकोल्यातून मोठी बातमी.. गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद झाला. यात दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 6 मे 2019 रोजी हुंडीवाले यांची हत्या झाली होती. मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता. यामध्ये पती आणि निवृत्त पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजीत गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपुत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर अहिर, सूरज गावंडे यांचा समावेश आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे कामा पाहिले. यात 10 आरोपींना जन्मठेप शिक्षा झाली आहे, तर पुराव्याअभावी पाच जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महत्त्वाची राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे. येथे आता शिवसेना शिंदे गटाचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. मनसेचे पाचही नगरसेवक शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे महापौरपदावर शिंदे गटाची मोहर लागली आहे. कोकणभवन येथे ५३ नगरसेवकांसह अधिकृत गट स्थापन करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचा महापौर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तास्थापनेसाठी मनसेसोबत समन्वय साधण्याच्या हालचाली वेग घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे, आमदार नरेश म्हस्के आणि मनसे नेते राजू पाटील यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. शिंदे गटाला निवडणुकीत ५४ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी अजून काही नगरसेवकांची आवश्यकता आहे. मनसेकडे पाच नगरसेवक असून ठाकरे गटातील दोन नगरसेवक संपर्कात असल्याचेही समजते.
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे या तीन पिढ्यांनंतर आता सानिका आवाडे यांच्या रुपाने चौथी पिढी राजकारणात उतरली आहे.
माजी मंत्री, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे. त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालायने आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच). परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगा बाबत च्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही, असे मत अॅड. असीम सोरेदे यांनी व्यक्त केले आहे.
एक हजार कोटींची गुंतवणूक खरंच आली असेल, तर तसं सांगा. आकडे कशाला फुगवून सांगत आहात. गेल्या पाच वर्षांत तुम्ही किती वेळा दावोसला गेलात ते सांगा. प्रत्येक वर्षाला जाता. हे आकडे जर पाहिले, तर जवळपास 75 लाख कोटींच्या वर जातात. ही गुंतवणूक कुठे आहे ते दाखवा. तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय, तेसुद्धा दाखवा असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026 च्या निमित्ताने आज अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना आज २१ जानेवारी रोजी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केलेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारे आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहेत. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.
ठाकरेसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनला जाणार असून तिथे ते पक्षाच्या नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करणार आहेत. यासाठी सर्व नगरसेवक कोकण भवन इथे जाणार आहेत.
आदिती तटकरेंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने संदर्भात दिली महत्वाची सूचना दिली आहे. तटकरेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.'
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात तब्बल एक लाख कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच गुंतवणुकीसह नवं तंत्रज्ञान देखील राज्यात येणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.