
New Delhi News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे. येत्या 1 एप्रिलपासून कांद्यावर शून्य टक्के निर्यात शुल्क असणार आहे.हा कांदा निर्यात करण्याबाबत मोठा निर्णय मानला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून शेतकर्यांमध्ये कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं कांदा(onion) उत्पादक शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी होती. निर्यात शुल्कामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसत होता. तसेच थोड्याच दिवसांत उन्हाळी कांदाही मार्केटमध्ये येत असताना आणखी भाव कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे शेतकरी वर्ग मोठा चिंतेत होता. पण आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांकडून गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याबाबतची मागणी जोरदारपणे सुरू होती. तसेच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे नाशिक येथे आले असतानाही कांदा उत्पादक शेतकर्यांकडून निर्यात शुल्क हटवण्याबाबत मागणी करण्यात आली होती.
नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित 'कृषी संवाद'कार्यक्रमानंतर शिवराजसिंह चौहान यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय यापूर्वी केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र,यात आणखी काही सुधारणा करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, त्यासाठी दिल्लीत इतर विभागांशीही चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.
केंद्र सरकारनं अखेर शनिवारी (ता.22) कांद्याच्या निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर संपूर्णत:मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे.या निर्णयामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून,कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दिनांक 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.