Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी प्रभागातील उमेदवारीवरून शिवसेनेतील आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषीकेश जैस्वाल तर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाऊ किंवा मुलासाठी दावा केल्याने तानातानी सुरू आहे.
अशातच युतीच्या बोलणीत तणवाणी यांना न घेतल्याने त्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत आमचा अडसर असेल तर पदमुक्त करा, म्हणत पालकमंत्र्यासमोरच त्रागा केला. तनवाणी यांच्या दबावतंत्रानंतर संजय शिरसाट यांनीही खेळी करत तनवाणी यांच्यासह विकास जैन यांचा समावेश मुख्य समन्वय समितीत करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार फायनल करताना सर्वसमावेशक निर्णय होईल, असे बोलले जात आहे. आधीच्या समन्वय समितीवर आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा प्रभाव दिसून येत होता. तनवाणी-जैस्वाल वाद आणि त्यातून जैस्वाल-जंजाळ यांना चेकमेट देण्याची संधी शिरसाट यांनी साधली. योग्य टायमिंग साधत शिरसाट यांनी तनवाणी- जैन यांना मुख्य समन्वय समितीत स्थान मिळवून देत जंजाळ यांनाही धक्का दिला आहे.
समितीत आता तीन विरुद्ध तीन असा सामना झाला आहे. शिरसाट आणि जैस्वाल यांचे प्रत्येकी तीन समर्थक या समितीत असल्याने खासदार संदीपान भुमरे यांची भूमिका उमेदवार यादी अंतिम करतांना निर्णयाक ठरणार आहे. महापालिका निवडणूकीसाठी तीन समित्या नुकत्याच जाहीर झाल्या होत्या.
त्यातील शिवसेनेच्या मुख्य समन्वय समितीत तनवाणी नसल्याने जैस्वाल यांचे पारडे जड ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची मंगळवारी बंगल्यावर भेट घेत 'आम्हाला विश्वासत घेतले जात नाही. स्थानिक पदाधिकारी निरोपही देत नाही. आमची अडचण होत असेल तर पदमुक्त करा', अशी टोकाची भूमिका घेतली होती.
दरम्यान, मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शहरात परतल्यावर यावर तोडगा काढू असे शिरसाट यांनी तनवाणींना आश्वासन दिले होते. काल बुधवारी सकाळी तनवाणी कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, नाशिकजवळ चालकाची तब्येत बिघडल्याने ते माघारी फिरले. त्यावेळी संजय शिरसाट यांनी मुख्य समन्वय समितीत तुमचा समावेश केला असल्याचे सांगितले. असे तनवाणी यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.
सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई कार्यालयातून सचिव संजय मोरे यांनी विकास जैन आणि तनवाणी यांच्या समावेशाची सुधारित सात जणांची यादी जाहीर केली. यात पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल यांचा समावेश आहे. समितीतील जैस्वाल पिता पुत्र, जंजाळ यांचे सध्या सख्य आहे. पालकमंत्री शिरसाट, त्यांचे निकटवर्तीय जैन आणि तनवाणी अशा या समितीत भुमरे यांचे मत निर्णायक ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.