Chhatrapati Sambhajinagar Political News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संभाजीनगर येथील जाहीर सभेत केलेल्या 'मोदीजी को यहां से कमल चुनके भेजोगे क्या' या आवाहनानंतर दोन्ही बाजूंनी संभाजीनगरच्या जागेवर दावा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले, यात संभाजीनगरचा समावेश नव्हता.
संभाजीनगरच्या जागेवरून या दोन्ही पक्षांमध्ये अनेक चर्चा आणि बैठका झाल्या, परंतु मार्ग निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या 10 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे माध्यमांना सांगितले. या यादीत छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार असेल का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शिवसेना-भाजप यांची राज्यात युती असताना संभाजीनगरची जागा कायम शिवसेना लढवत आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या 30-35 वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेने लढवलेल्या या पारंपरिक जागेवर पक्षफुटीनंतरही शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला आहे. संभाजीनगरची जागा भाजपला सोडल्यास ठाकरे गट शिंदे यांच्या शिवसेना विरोधात आक्रमकपणे प्रचार करून त्याचा फायदा उचलण्याची शक्यता आहे. संभाजीनगरसारखी जागा आता भाजपला दिली तर ती पुन्हा कधीच शिवसेनेकडे येऊ शकत नाही, असा एक मतप्रवाह आहे.
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरच्या जागेवर तडजोड करू नका, यासाठी जिल्ह्यातील मंत्री व आमदारांचाही दबाव मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असून, त्याऐवजी दुसरा मतदारसंघ भाजपला देण्याची तयारी दर्शवली असल्याची खात्रिलायक माहिती आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे महायुतीतील घटक पक्षांची रखडलेली यादी यातून चुकीचा संदेश जाऊ नये, याची खबरदारी घेत भाजप संभाजीनगरच्या जागेवरून एक पाऊल मागे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या यादीमध्ये संभाजीनगरचा समावेश असेल की नाही? याची उत्सुकता महायुतीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही लागली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे.
भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ संभाजीनगरमध्ये येत नसला तरी मंत्री म्हणून गेल्या वर्ष दीड वर्षापासून त्यांचा जिल्ह्याशी संपर्क आलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण दिल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा उमेदवार म्हणून भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असेही बोलले जाते.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.