Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा शब्द न पाळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीला पंढरपुरात येण्याचा नैतिक अधिकार नाही. दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते. यावेळी मात्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे शासकीय पूजेला न येता घरात बसूनच पांडुरंगाची पूजा करावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्याना पंढपुराला शासकीय पूजेला येण्यासाठी तीव्र विरोध केला आहे. जरांगे पाटील यांना मुंबईत मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आक्षेप मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्राकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांनी भरसभेत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार सवलती दिल्या जातील, तसेच मराठा आरक्षणातील Maratha Reservation आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना नोकऱ्या दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र सहा महिने झाले तरी यातील एकही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे पूर्ण करू शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांना Eknath Shinde आपल्या दिलेल्या शब्दावर जरा जरी विश्वास असेल तर त्यांनी पंढरपुरात शासकीय पूजेस येण्याचे टाळावे, असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकावर सतीश काळे, वैभव जाधव, रावसाहेब गंगाधरे,नकुल भोईर,गणेश दहिभाते,अभिषेक म्हसे,संतोष शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खोटी आश्वासने देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या खोटारड्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. कारण आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या आजही थांबलेल्या नाहीत. याची सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आहेत, असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.