Hidayat Patel News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत उल्ला खा बरकत उल्ला खा पटेल (वय ६७) हे मंगळवारी अकोट तालुक्यातील मोहाळा येथील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले होते. नमाजानंतर दुपारी दीडच्या सुमारास उबेद उर्फ उमेद पटेल कालू पटेल (वय २५) या युवकाने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. मान व पोटावर गंभीर जखमा झाल्याने हिदायत पटेल रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले.
उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना अकोट येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. मात्र अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, २४ मे २०१९ रोजी भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे. आजचा हल्लेखोर उबेद पटेल हा मृतक मतीन पटेल यांचा पुतण्या असून, काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याची चर्चा आहे. सहा महिन्यांपूर्वी उबेद पटेल याने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.
आरोपीला अटक
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने काही तासांतच आरोपीला पणज येथून अटक केली आहे. हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अकोला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी घेतली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.